केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ( S. Jaishankar) नुकतेच पाकिस्तान दौऱ्यातून परतले आहेत. ते पाकिस्तानमध्ये शांघाय सहकारी परिषदेच्या बैठकीत भाग घेण्यासाठी गेले होते. भारताचे परराष्ट्र मंत्री तब्बल 9 वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे हा दौरा विशेष महत्त्वाचा होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध सुरळीत होण्यासाठी या दौऱ्यात प्रयत्न होणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. परराष्ट्र संबंधामधील अभ्यासकांप्रमाणेच क्रिकेट फॅन्सचं देखील या दौऱ्याकडं लक्ष होतं. कारण भारतीय क्रिकेट टीम पुढच्या वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी जाण्याबाबत या दौऱ्यात चर्चा होईल, अशी त्यांना आशा होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांमध्ये क्रिकेटवर चर्चा?
भारतीय क्रिकेट टीमनं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जावं अशी पाकिस्तानची इच्छा आहे.
दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी 2015 नंतर पहिल्यांदाच थेट चर्चा केली. 'इंडियन एक्स्प्रेस'नं दिलेल्या वृत्तानुसार एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्यात 24 तासांमध्ये किमान 2 वेळा चर्चा झाली.
( नक्की वाचा : IND vs NZ : बंगळुरु टेस्टमध्ये टीम इंडियाची दाणादाण, 46 रनमध्ये पहिली इनिंग संपुष्टात )
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का?
आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा फेब्रुवारीमध्ये होणार आहे. या स्पर्धेचं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यजमान आहे. भारतीय क्रिकेट टीमनं या दौऱ्यासाठी पाकिस्तानला यावं यासाठी पीसीबी प्रयत्न करत आहे. भारतानं पीसीबीची विनंती मान्य केली तर टीम इंडियाचा 17 वर्षानंतर पाकिस्तानचा हा दौरा असेल. पीसीबीनं भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव दिला होता. पण, भारतानं अन्य ठिकाणी देखील खेळावं अशी स्पर्धेच्या ब्रॉडकास्टर्सचा आग्रह आहे. या आग्रहानंतर पीसीबीनं भारताचा एक सामना रावळपिंडीमध्ये ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
( नक्की वाचा : Kamran Ghulam : कामरान गुलामला पाकिस्तानी बॉलरनं लगावली होती भर मैदानात थप्पड, Video )
बीसीसीआयची इच्छा असेल तर टीम इंडियाला प्रत्येक मॅचनंतर मायदेशी जाता यावं यासाठी भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये ठेवण्याचा प्रस्ताव आहे, असं पीसीबीनं स्पष्ट केलं आहे.
परराष्ट्र मंत्र्यांचं स्पष्टीकरण
दरम्यान याबाबतच्या वृत्तानुसार केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. शांघाय परिषदेच्या दरम्यान मंगोलियासोडून कोणत्याही देशाशी द्वैपक्षीय चर्चा झालेली नाही. एस. जयशंकर आणि इशाक डार यांच्यामध्ये फक्त सामान्य चर्चा झाली. त्यांच्यामध्ये कोणत्याही एखाद्या विषयावर चर्चा झालेली नाही. या चर्चेत क्रिकेटचा विषय निघाल्याचं वृत्त निराधार असल्याचं स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतर एस. जयशंकर यांच्या दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट टीमच्या पाकिस्तान दौऱ्याचं भवितव्य स्पष्ट होईल, ही आशा फोल ठरली आहे.