
WTC Final 2025 : क्रिकेट विश्वातील चोकर्स टीम कोणती? असा प्रश्न विचारला की सर्वजण हमखास दक्षिण आफ्रिका हे उत्तर देतात. त्याला कारणही तसंच आहे. निर्णायक क्षणी कच खाणारी, विजेतेपदाच्या जवळ आल्यावर पराभूत होणारी टीम अशी दक्षिण आफ्रिकेची परंपरा आहे. 21 व्या शतकातील आजवरच्या प्रत्येक आयसीसी स्पर्धेत हेच घडलंय. पण, ही परंपरा अखेर मोडित निघाली आहे.
टेम्बा बवुमाच्या (Temba Bavuma) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship 2023-2025) स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्सच्या स्टेडियमवर 'चोकर्स' दक्षिण आफ्रिकेनं हा इतिहास रचला आहे. त्यांनी फायनलमध्ये विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सनं पराभव केला. एडन मार्करामची (Aiden Markram) चौथ्या इनिंगमधील अजरामर सेंच्युरी हे आफ्रिकेच्या विजयाचं खास वैशिष्ट्य ठरलं.
( नक्की वाचा : WTC Final : दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या इतिहासात अमर झाला मार्कराम, 'हा' पराक्रम करणारा पहिला खेळाडू )
मार्करामला टेम्बा बवुमानं (66 रन्स) दिलेली साथ, या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेली 147 रन्सची पार्टनरशिप या विजयात निर्णायक ठरली. त्याचबरोबर आफ्रिकेचा हुकमी एक्का असलेल्या कागिसो रबाडानं (Kagiso Rabada) फायनलमध्ये फॅन्सना निराशा केली नाही. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये 5 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 4 अशा एकूण 9 विकेट्स घेत त्याचं काम चोख केलं होतं
चौथ्या इनिंगमधील झुंजार खेळ
दक्षिण आफ्रिकेला चौथ्या इनिंगमध्ये विजयासाठी 282 रन्सचं आव्हान होतं. लॉर्ड्स स्टेडियमचा इतिहास, आफ्रिकेची चोकर्स ही परंपरा, स्टार्क-कमिन्स-हेजलवूड हा ऑस्ट्रेलियाचा खरतरनाक अटॅक या सर्व गोष्टी आफ्रिकेच्या विरोधात होत्या. पण, चौथ्या इनिंगमध्ये इतिहास घडला.
( नक्की वाचा : SA vs AUS: कागिसो रबाडाच्या 'पंजा'नं कांगारुंची शिकार! नव्या रेकॉर्डसह उडवली वर्ल्ड चॅम्पियनची दाणादाण )
एडन मार्कराम या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला. त्यानं या इनिंगमध्ये 156 बॉलमध्ये अविस्मरणीय सेंच्युरी झळकावली. मार्कराम आणि कॅप्टन बवुमा यांनी तिसऱ्या दिवशी शेवटच्या सेशनमध्ये संयमी बॅटिंग करत ऑस्ट्रेलियावर खेळ उलटवला.
बवुमा चौथ्या दिवशी झटपट आऊट झाला. पण, त्यानंतरही मार्कराम घट्ट पाय रोवून उभा होता. त्यानं टीम विजयाच्या मार्गावरुन भरकटणार नाही, याची काळजी घेतली. मार्करामनं 207 बॉलमध्ये 136 रन्स काढले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world