WTC 2023-25 Points Table : भारतानं बांगलादेशविरुद्ध झालेली टेस्ट सीरिज 2-0 अशा फरकानं जिंकली आहे. पावसाचा अडथळा देखील भारताला कानपूरमधील विजयापासून रोखू शकला नाही. टीम इंडियानं ही टेस्ट 7 विकेट्सनं जिंकली. भारतीय क्रिकेट टीमनं मायदेशात जिंकलेली ही सलग 18 वी टेस्ट सीरिज आहे.
भारताच्या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. भारतानं ही सीरिज 2-0 अशा फरकानं जिंकत नंबर 1 वरील जागा आणखी बळकट केली. ही सीरिज जिंकल्यानंतर टीम इंडियाचे 74.24 पर्सेंटेज ऑफ पॉईंट्स (PCT) झाले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील या टप्प्यात टीम इंडियानं आत्तापर्यंत 11 टेस्ट खेळल्या असून त्यापैकी 8 टेस्ट जिंकल्या आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टीम इंडियाचे मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचे आत्तापर्यंत अनुक्रमे 62.50 आणि 55.56 पर्सेंटेज पॉईंट्स आहेत. ऑस्ट्रेलियानं या टप्प्यात आत्तापर्यंत 12 तर श्रीलंकेनं 9 टेस्ट मॅच खेळल्या आहेत.
कसा आहे टीम इंडियाचा मार्ग ?
टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या टप्प्यात आणखी 8 टेस्ट शिल्लक आहेत. त्यापैकी 3 न्यूझीलंडविरुद्ध तर 5 ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट भारतामध्ये तर ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सीरिज ऑस्ट्रेलियात होणार आहे. भारताला या स्पर्धेची सलग तिसऱ्यांदा फायनल गाठण्यासाठी उर्वरित आठपैकी किमान तीन टेस्ट मॅच जिंकण्याची गरज आहे.
( नक्की वाचा : IND vs BAN : टीम इंडियानं दाखवली बांगलादेशला जागा, 3 दिवसांमध्येच मिळवला दणदणीत विजय )
न्यूझीलंडविरुद्ध होणारी तीन टेस्टची सीरिज भारतानं 3-0 अशा फरकानं जिंकली तर टीम इंडियाचा फायनलमधील प्रवेश जवळपास नक्की होईल. डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील एका टेस्टमधील विजय टीम इंडियाची फायनलमधील जागा नक्की करेल. त्या सीरिजमध्ये एकही टेस्ट जिंकण्यास टीम इंडियाला अपयश आलं तर भारतीय टीमचं भवितव्य श्रीलंकेच्या वाटचालीवर अवलंबून असेल.