
Emotional Video : जगण्यासाठीचा संघर्ष काय असतो हे दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ना डोक्यावर छप्पर, ना हातात खेळायला खेळणी, ना कोणी लाड करणारं- ना खेळवणारं...तरीही भर उन्हात हा तीन वर्षांचा चिमुरडा एकटाच खेळतोय अन् हसतोयही. आई जवळच बांधकाम मजुरीचं काम करते. मुलाकडे चोवीस तास लक्ष देता येत नाही. घरात कोणी सांभाळणारं नाही. अशावेळी ही आई लेकाला सोबत कामावर घेऊन येते. तो सतत जवळ येऊ नये, पळापळ करू नये यासाठी दोरीने त्याचे पाय एका दगडाला बांधून ठेवते. तो काही बोलू शकत नाही. खरं त्याला बोलताच येत नाही... तो लहानपणापासून आजारी आहे.. मात्र परिस्थिती इतकी बिकट की त्याच्यावर उपचार करणंही शक्य नाही...
हे दृश्य आपण पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो. पण त्या आईने मात्र मन घट्ट करीत परिस्थिती स्वीकारली आहे आणि दु:ख मागे टाकत तिच्या चेहऱ्यावर हास्यचं दिसून येतं. अखेर तिच्या संघर्षाचं फळ मिळालंय. या बाळासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहे. मुलावर उपचार करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता तरी बाळाच्या पायातील दोरखंड सुटेल अन् तो मुक्तपणे खेळू शकेल अशी अपेक्षा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना आहे साताऱ्यातील...सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दानवली गावातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्यात एक मजूर महिला आपल्या पोटच्या मुलाच्या पायाला दोरी बांधून ती दोरी एका दगडाला बांधून ठेवते. ती महिला शेजारीच मजूरीचं काम करते. पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या लहान लेकराला कशापद्धतीनं बांधून ठेवले आहे हे दिसतंय. इतकच नाही तर या लहान मुलाला बोलताही येत नाही. आणि हे मूल बोलावं म्हणून उपचार करायला तिच्याकडे पैसे नाहीत, युट्यूब इन्फ्लुएन्सर शितल दानवलेने हा व्हिडिओ शूट केला आहे. बाळाच्या त्या स्थितीबद्दल ती दु:ख व्यक्त करते. शितलने बाळावर उपचार व्हावेत यासाठी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
नक्की वाचा - Kunal Kamra : एकनाथ शिंदेंवरच नाही तर पंतप्रधान मोदींवरही गाणं; कुणाल कामराची 'ही' सहा गाणी व्हायरल
नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ उचलून धरला आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत पोहचला आणि त्यांनी हा या मुलाच्या उपचाराची जबाबदारी उचलली आहे, असं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे या मुलाच्या पायातून हा दोरखंड निघेल आणि उपचारानंतर तो बोलू शकेल असा विश्वास बाळाच्या आईने व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world