Job Loss Viral Video: पैसा... आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा! तुम्ही कितीही चांगले स्वभावाचे असाल, पण तुमच्या खिशात जर पैसा नसेल, तर समाजात आणि कुटुंबातही तुमचं स्थान डळमळीत होतं. आर्थिक ताकदच तुमचं मूल्य आणि सन्मान ठरवते, हे कठोर वास्तव पुन्हा एकदा समोर आणणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नोकरी गमावल्यानंतर एका तरुणाला त्याच्या कुटुंबाकडून आलेल्या कटू अनुभवाने नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.
काय आहे Video?
हा व्हिडीओ सध्या पुरुषवर्गाचं आयुष्य किती कठीण आहे, यावर प्रभावी भाष्य करत आहे. या व्हिडीओमधील तरुण सांगतोय की, अवघ्या 3 दिवसआधी त्याची नोकरी गेली. ही गोष्ट घरी समजताच कुटुंबातील लोकांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. आधी प्रेम दाखवणारी आईही यावेळी बदलली, तर वडिलांनीही उपरोधिक बोलून त्याला दुखावलं.
घरातील मंडळी कशी बदलली?
हा हृदयस्पर्शी व्हिडीओ indiaonfeed.in या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. तरुण नोकरी गमावलेल्या एका व्यक्तीची भूमिका साकारत, त्याची मानसिक अवस्था नेमकी कशी होते, हे दाखवत आहे. तो भावुक होऊन सांगतो, "माझी नोकरी जाऊन 3 दिवस झाले, त्यामुळे मी घरी आलो. पण हा अनुभव माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होता. आधी जेव्हा मी घरी यायचो, तेव्हा आई माझ्याजवळ येऊन प्रेमाने दोन पोळ्या जास्त खायला द्यायची. पण यावेळी मात्र कोणीच मला जेवणसुद्धा विचारलं नाही."
( नक्की वाचा : Cab Driver : 'भैय्या' म्हणू नका... ' कॅब ड्रायव्हरने कारमध्ये प्रवाशांसाठी लावले 6 'कडक' नियम, चर्चा तर होणारच )
त्याचं हे बोलणं इथेच थांबलं नाही. तो पुढे सांगतो, "मी जेवताना दोन पोळ्या जास्त मागितल्या, तेव्हा माझी खिल्ली उडवण्यात आली. बाबांनी देखील, 'तुला खरंच दोन पोळ्या जास्त हव्यात का?' असा उपरोधिक प्रश्न विचारला. तुम्ही पैसे कमवत नसाल, तर तुमचं कुटुंबही तुमची पर्वा करत नाही. समाजातही तुम्हाला मान-सन्मान तुमच्या आर्थिक ताकदीमुळेच मिळतो."
नेटकऱ्यांनी व्यक्त केलं 'कठोर सत्य'
या व्हिडिओमध्ये तरुणाने अतिशय प्रभावीपणे नोकरी गेलेल्या पुरुषाच्या भूमिकेतून, घरातील बदललेले वागणे आणि मानसिक ताण सांगितला आहे. त्याचा हा भावुक करणारा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडिओला 2 लाख 75 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तो झपाट्याने व्हायरल होत असून मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक युजर्सनी हेच पुरुषाचं आयुष्य असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी 'पैसा हेच या जगाचं अंतिम सत्य आहे,' अशा आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत. खरं तर, हा व्हिडीओ केवळ एका व्यक्तीची गोष्ट नसून, तो आजच्या जगातील 'पैशाचं महत्त्व' आणि नोकरी गमावलेल्या व्यक्तीच्या भावनांशी संबंधित एका कठोर वास्तवावर प्रकाश टाकतो, अशी भावना युझर्सनी व्यक्त केल्या आहेत.