रेवती हिंगवे, प्रतिनिधी
नववर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. 31 डिसेंबरच्या रात्री ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. पब, रेस्टॉरंट, डिस्कोमध्येही विशेष आयोजन केलं जातं. पुण्यात 31 डिसेंबरनिमित्त पबमध्ये मोठी जय्यत तयारी सुरू आहे. ठिकठिकाणी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. शासनाकडून हॉटेल-बार-रेस्टॉरंट आणि बिअर शॉप रात्री उशीरापर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून अधिक काळजी घेतली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान पुण्यातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचं पाकीट देण्यात येणार आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या आहेत.
नक्की वाचा - Pune Crime News : नातीसारख्या चिमुरड्यांवर पडली नराधमाची नजर, चॉकेलटेचं आमिष दाखवून घरी बोलावलं आणि...
तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचं पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंदवले जात आहेत. या पब व्यवस्थापकांकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे. मात्र कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.