Pune News: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात सध्या एका वेगळ्याच विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि वर्दळीच्या रस्त्यांवर अचानक झळकलेल्या काही रहस्यमयी होर्डिंग्जनी पुणेकरांचेच नव्हे, तर संपूर्ण सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे. या होर्डिंग्जवर एका मुलाची माहिती दिली असून दुसऱ्या एका मोठ्या होर्डिंगवर चक्क "24 जुलैला भेटशील ना?" असा थेट प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यामुळे सध्या पुण्यात आणि इंटरनेटवर "कोण आहे हा आणि कोणाला भेटायला बोलावतोय?" असाच प्रश्न विचारला जात आहे.
नेमकं काय आहे या होर्डिंगवर?
पुण्यातील मुख्य रस्त्यांवरून प्रवास करताना सध्या वाहनचालकांचे हे खास होर्डिंग्ज लक्ष वेधून घेत आहेत. यापैकी एका होर्डिंगवर एका तरुणाची संपूर्ण माहिती (प्रोफाइल) देण्यात आली आहे. तर दुसऱ्या लक्षवेधी होर्डिंगवर अतिशय ठळक अक्षरात ‘24 जुलैला भेटशील ना?' असे लिहिण्यात आले आहे. हे वाचून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात कुतूहल निर्माण होत आहे.
(नक्की वाचा: VIDEO: शिवीगाळ, दादागिरी अन्.... प्रसिद्ध मराठी गायिकेला भररस्त्यात भयंकर अनुभव!)
कुणा प्रेमवीराची साद की प्रमोशनचा फंडा?
पुण्यात याआधीही अशाच प्रकारचे होर्डिंग्ज रातोरात व्हायरल झाले होते. त्यामुळे आता या नव्या होर्डिंगबाबतही वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. काहींच्या मते, हा एखाद्या प्रेमवीराने आपल्या प्रेयसीची मनधरणी करण्यासाठी किंवा तिला प्रपोज करण्यासाठी केलेला खास खटाटोप असू शकतो.
तर दुसरीकडे बहुतांश पुणेकर आणि नेटकऱ्यांचा असा अंदाज आहे की, हा नक्कीच एखाद्या नवीन मराठी सिनेमा, नाटक, वेब सीरिज किंवा एखाद्या ब्रँडच्या प्रमोशनचा भाग आहे. आजकाल प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशा प्रकारच्या हटके आणि सस्पेन्स निर्माण करणाऱ्या जाहिरातींचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तर "कोण आहे ती भाग्यवान?", "पुणे तिथे काय उणे!" आणि "आता 24 तारखेलाच पुण्यात ट्रॅफिक जाम होणार" अशा मजेशीर प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
(नक्की वाचा: मुंबईत चाललंय काय? शेवपुरी खाण्यासाठी ड्रायव्हरनं BEST बस भररस्त्यात 20 मिनिटं थांबवली; धमकीही दिली, VIDEO)
24 जुलैलाच उलगडणार रहस्य!
सध्या तरी या रहस्यमयी होर्डिंगमागील खरा सूत्रधार कोण आहे आणि 'ती' व्यक्ती खरोखरच 24 जुलैला भेटणार का? हे सर्व गुलदस्त्यातच आहे. ही खरोखरच कोणाची तरी प्रेमकहाणी आहे की निव्वळ एक जाहिरात? याचे उत्तर आता थेट 24 जुलैलाच मिळणार आहे. त्यामुळे पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता 24 जुलैच्या तारखेकडे लागले आहे.