सांगलीतील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर योगेश माईणकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एका गंभीर त्रुटीवर प्रकाश टाकला आहे. गेल्या 18-19 वर्षांपासून प्रॅक्टिस करत असलेल्या डॉ. माईणकर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांनी केलेल्या एका कुतूहलपूर्ण प्रयोगातून लॅबच्या रिपोर्टवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डॉ. माईणकर यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या एका रुग्णाचे रक्त नमुने घेतले. हे नमुने त्यांनी चक्क 4 वेगवेगळ्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले. धक्कादायक बाब म्हणजे, या चारही लॅबनी रक्तातील साखरेच्या (ब्लड शुगर) पातळीचे वेगवेगळे रिपोर्ट दिले.
( नक्की वाचा: शरीरातील ब्लड शुगरची पातळी किती असावी? डायबेटीस कधी होतो ? )
ब्लड शुगर लेव्हल किती आली?
- एका लॅबने शुगर लेव्हल 126 दाखवली.
- दुसऱ्या लॅबने शुगर लेव्हल 300 दाखवली.
- तिसऱ्या लॅबने ही लेव्हल 390 दाखवली.
- तर चौथ्या लॅबने 421 दाखवली.
डॉ. माईणकर यांनी ही बाब त्यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. या प्रयोगातून असे दिसून येते की, लॅबच्या अहवालांवर पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य नाही.
( नक्की वाचा: साखर खाणे पूर्णपणे बंद करण्याचे 5 मोठे दुष्परिणाम )
डॉ. माईणकर यांनी या व्हिडीओच्या शेवटी सल्ला दिला आहे की, लॅबच्या अहवालांवर फारसे अवलंबून न राहता, आपले शरीर काय सांगते याकडे अधिक लक्ष द्यावे. शरीराची लक्षणे आणि अनुभव हे देखील महत्त्वाचे मार्गदर्शक ठरू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी म्हटलंय की, "मी वैयक्तिकरित्या अशा प्रकरणांवर टिप्पणी करणं टाळतो जिथे रुग्णाची माहिती किंवा पूर्वीचे reports उपलब्ध नाहीत. तरी हे reports पाहता sugar खूप जास्त असून uncontrolled diabetes असण्याची शक्यता आहे. अशा फरकाचं कारण sample handling, machine calibration किंवा reporting error असू शकतं, आणि lab incharge/ pathologist यांची जबाबदारी reports योग्य तपासून पाठवण्याची असते. isolated incidents मुळे संपूर्ण system वर शंका निर्माण होणं चुकीचं आहे , तसेच समाजात भीती / गैरसमज पसरू नयेत हे सर्वांनीच पाहीले पाहीजे."