Viral Video: भिकारी समजून मदत करायला गेला; इन्फ्लुएन्सरसोबत विचारही केला नसेल असं घडलं

Viral Video: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मयुरेश गुजर (Mayuresh Gujar) हा अनेक गरजू लोकांना 'पाप पुण्य का हिसाब' म्हणत मदत करत असतो. या दरम्यान, मयुरेश मुंबईत एका वृद्ध व्यक्तीला मदत करण्यासाठी गेला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

जाहिरात
Read Time: 3 mins

रस्त्यावर अनेकदा आपल्याकडे काहीतरी मदत मागणारे लोक भेटतात, ज्यांना आपण अनेकदा सहजपणे भिकारी समजतो. मात्र, प्रत्येक वेळी ही व्यक्ती भिकारीच असेल असं नाही. काही लोकांची परिस्थिती त्यांना तसे वागायला भाग पाडते. अशीच एक अविश्वसनीय आणि हृदयस्पर्शी घटना मुंबईतून समोर आली आहे. जिथे एका वृद्ध व्यक्तीचा अवतार पाहून कुणीही त्यांना सहज भिकारी म्हणेल, पण त्यांच्या बोलण्याने ऐकणाऱ्याची समज बदलू शकते.

इन्फ्लुएन्सरला आला अनपेक्षित अनुभव

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मयुरेश गुजर (Mayuresh Gujar) हा अनेक गरजू लोकांना 'पाप पुण्य का हिसाब' म्हणत मदत करत असतो. या दरम्यान, मयुरेश मुंबईत एका वृद्ध व्यक्तीला मदत करण्यासाठी गेला. पण तिथे पोहोचल्यावर मयुरेशने कधी विचारही केला नसेल असा अनुभव त्याला आला.

फाड-फाड इंग्रजी 

मयुरेश जेव्हा त्या व्यक्तीजवळ पोहोचला, तेव्हा त्यांनी फाड-फाड इंग्रजीत संवाद साधायला सुरुवात केली. विशेष म्हणजे, ही व्यक्ती मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये  सहज संवाद साधत होती. बाहेरून भिकारी वाटत असले तरी, या व्यक्तीमध्ये स्वाभिमान ठासून भरलेला होता.

Advertisement

(नक्की वाचा-  VIDEO: नवले पुलावर वसंत मोरे थोडक्यात बचावले! फेसबुक लाईव्ह दरम्यानचा व्हिडीओ आला समोर)

मदतीसाठी नकार आणि कारण

मयुरेशने त्या व्यक्तीची अवस्था पाहून त्यांना केस कापण्याचा आग्रह केला. परंतु, त्या व्यक्तीने स्पष्ट नकार देत सांगितले, "मी केस कापले, तर मला कुणीही मदत करणार नाही." आपण लोकांकडे मदत का मागतो, याचे कारण सांगताना ते म्हणाले, "मी कधी कुणाकडे मागून खात नव्हतो. मी रोज प्लास्टिकच्या बाटल्या, लोखंड, ॲल्युमिनिअम गोळा करून ते भंगारात विकत होतो. त्यातून जे पैसे मिळायचे, त्यातून मी माझे पोट भरत होतो.

पुढे त्यांनी आपले दुःख व्यक्त करताना सांगितले की, "आता माझी दृष्टी कमी झाली आहे. जवळचेही काही मला नीट दिसत नाही. म्हणून मला लोकांकडे खाण्यासाठी किंवा पैसे मागावे लागत आहेत." यानंतर मयुरेशने त्यांना वडापाव, चिप्स, फळे असे काही खाद्यपदार्थ आणून दिले. इतकेच नाही तर, मयुरेशने त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्याची ऑफरही दिली. परंतु, त्यांनी त्यासाठीही नकार दिला.

Advertisement

"गोष्टी नेहमी आपल्या अपेक्षेनुसार होत नाहीत"

मयुरेश गुजरने हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शन मध्ये लिहिले की, "सामाजिक कार्याचे वास्तव… गोष्टी नेहमी आपल्या अपेक्षेनुसार होत नाहीत. अनेक वेळा आपल्याला आणखी काही करण्याची इच्छा असते. पण परिस्थिती आणि आयुष्य आपल्याला तसे करण्याची परवानगी देत नाही. तरीही, आपण समोर जातो. आपण प्रयत्न करतो. तरीही आपण आपल्याला शक्य होईल तितकं करतो.  कारण, आपण सर्वकाही बदलू शकत नसलो तरी… आपण 'काहीतरी' नक्कीच बदलू शकतो."

हा व्हिडीओ पोस्ट झाल्याच्या एक दिवसातच 11 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून, 1 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. व्हिडोओवर भरभरून कमेंट्सही येत आहेत. 
 

Advertisement
Topics mentioned in this article