Viral Video: कपाटाच्या एका कोपऱ्यात वर्षांनुवर्षे जपून ठेवलेली पुंजी जेव्हा अचानक हाताला लागते, तेव्हा जो आनंद होतो तो शब्दात सांगता येत नाही. पण तोच आनंद काही सेकंदात मोठ्या निराशेमध्ये बदलला तर? सोशल मीडियावर सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. एका महिलेने तिच्या नवऱ्यापासून लपवून घरखर्चातून वाचवलेले पैसे एका सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. संकटकाळात कामाला येतील या विचाराने साठवलेली ही रक्कम जेव्हा अनेक वर्षांनंतर बाहेर आली, तेव्हा घरातील सर्वांचेच डोळे पाणावले.
नेमकं काय घडलं?
भारतात अनेक घरांमध्ये गृहिणी आपल्या पतीला न सांगता घरखर्चातून थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवतात. भविष्यातील गरजा किंवा अडीअडचणीच्या वेळी कोणासमोर हात पसरायला लागू नये, हा त्यामागचा शुद्ध हेतू असतो. या महिलेनेही अगदी तसंच केलं होतं. तिने साठवलेली ही रक्कम कपाटाच्या अशा एका भागात ठेवली होती, जिथे कोणाचेही लक्ष जाणार नाही.
वर्ष बदलली, घरच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि ही महिला स्वतःच आपल्या या लपवलेल्या पुंजीबद्दल विसरून गेली. अनेक वर्षांनंतर जेव्हा घराची साफसफाई सुरू होती, तेव्हा अचानक तो जुना कोपरा उघडला आणि नोटांचे पुडके बाहेर आले.
( नक्की वाचा : Dombivli News: माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण )
का बसला फटका?
कपाटातून बाहेर आलेल्या त्या नोटा पाहून सुरुवातीला कुटुंबाला वाटले की जणू काही जुना खजिनाच सापडला आहे. मात्र, जेव्हा त्या नोटा नीट पाहिल्या, तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या सर्व नोटा 500 आणि 1000 रुपयांच्या होत्या.
2016 मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत. ज्या रक्कमेवर या महिलेला मोठा आधार वाटत होता, ती रक्कम आता केवळ कागदाचे तुकडे उरली होती. 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने घेतलेल्या त्या निर्णयामुळे या जुन्या नोटा आता कायदेशीररित्या कोणत्याही व्यवहारासाठी वापरता येत नाहीत, हे सत्य समोर येताच त्या माउलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.
( नक्की वाचा : Stephen Hawking: जेफ्री एपस्टीनच्या त्या बेटावर स्टीफन हॉकिंग काय करत होते? बिकिनीतील महिलांसोबतचे Photo Viral )
सोशल मीडियावर व्हिडिओची चर्चा
हा सर्व प्रकार या महिलेच्या मुलीने कॅमेरात कैद केला असून तो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती मुलगी गमतीने ही सर्व हकीकत सांगताना दिसते, पण तिच्या आईच्या चेहऱ्यावरचे दुःख लपत नाही. माथ्यावर हात मारून बसलेल्या त्या महिलेची अवस्था पाहून अनेकांना जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
नोटबंदीच्या काळात अनेकांनी रांगेत उभे राहून पैसे बदलून घेतले, पण अनेक घरांमध्ये अशा प्रकारे विसरून गेलेली रक्कम आजही कोपऱ्यात पडून असावी, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. कष्टाचे पैसे अशा प्रकारे मातीमोल झाल्याचे पाहून नेटिझन्स हळहळ व्यक्त करत आहेत.
इथे पाहा VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world