बांगलादेशमधील परिस्थिती (Bangladesh Unrest) वेगानं बदलत आहे. आरक्षणाच्या मुद्यावर सुरु झालेल्या आंदोलनाची रविवारी दिशा बदलली. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला. अखेर हसीना यांना सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्या त्यांच्या बहिणीसह देश सोडून निघून गेल्या. याबाबत प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार शेख हसीना यांचं विमान भारतामधील हिंडन विमानतळावर उतरलंय. हसीना त्यांची बहिण रेहानासोबत हिंडनहून लंडनला जातील.
शेख हसीना यांनी सत्ता सोडल्यानंतर बांगलादेश सैन्यानं (Bangladesh Army) सत्ता हाती घेतली. लष्करप्रमुखांनी शेख हसीना यांना जीव वाचवण्यासाठी फक्त 45 मिनिटांमध्ये देश सोडण्याचा आदेश दिला होता. शेख हसीना यांच्या राजकीय कारकीर्दीमधील ती सर्वात खडतर 45 मिनिटं होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तेंव्हा काय घडलं?
न्यूज एजन्सी AFP च्या रिपोर्टनुसार शेख हसीना यांची पंतप्रधान म्हणून हिंसाचाराबाबत भाषण रेकॉर्ड करण्याची इच्छा होती. पण, त्यांना ती संधी मिळाली नाही. सैन्यानं आदेश दिल्यानंतर हसीना यांनी त्यांचा राजीनामा अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांना द्यावा लागला. जीव वाचवण्यासाठी त्या सुरक्षित जागेच्या शोधात देशाबाहेर रवाना झाल्या.
दुपारी साधारण 2 वाजता शेख हसीना त्यांच्या बहिणीसह लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून ढाकाहून भारताच्या दिशेनं रवाना झाल्या. भारतामधील हिंडन विमानतळावरुन त्या लंडनला जाणार आहेत. शेख हसीना यांनी पद सोडल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी हजारो बांगलादेशी नागरिक रस्त्यावर उतरले.
( नक्की वाचा : Sheikh Hasina : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, देश सोडून भारतामध्ये दाखल )
भारताचं होतं लक्ष
शेख हसीना यांनी ढाका सोडताच भारतीय सुरक्षा एजन्सी सक्रीय झाल्या. दिल्लीच्या दिशेनं येणाऱ्या C-130 विमानावर त्यांचं लक्ष होतं. त्यानंतर गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर शेख हसीना यांचं विमान लँड होण्याचं वृत्त आलं. AFP च्या वृत्तानुसार इमिग्रेशन टीम देखील हिंडन एअरबेसवर दाखल झाली. संपूर्ण औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर शेख हसीना आणि त्यांच्या बहीण लंडनला रवाना होतील.
लष्करप्रमुखांनी काय सांगितलं?
शेख हसीना यांनी देश सोडताच बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार-उज-जमान यांनी पत्रकार परिषद घेतली. जमान यांनी सांगितलं की, 'तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करु. आम्ही देशात शांतता परत आणू. आम्ही या देशात अंतरिम सरकार चालवू. तोडफोड आणि जाळपाळोपासून दूर रहा. तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर परिस्थिती सुधारेल. हिंसाचार आणि मारहाणीतून काहीही साध्य होणार नाही. अराजकतेपासून दूर राहा.'
पंतप्रधान निवासस्थानात आंदोलक घुसले
शेख हसीना यांनी देश सोडताच आंदोलक आणखी आक्रमक झाले. त्यांनी 'गणभवन' या पंतप्रधानांच्या निवासस्थावर धाव घेतली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फुटेजमध्ये आंदोलक पंतप्रधान निवासस्थानातील बेडरुममध्ये पाय पसरुन आराम करताना दिसले. तर दुसऱ्या फुटेजमध्ये पंतप्रधान निवासस्थानातील स्वयंपाकघरातील साहित्य घेऊन जाताना आणि चिकन खाताना दिसत आहेत.