Bangladesh Violence : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आंदोलकांच्या विरोधानंतर पदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. शेख हसीना यांची सत्ता उलथवणे हे कंटरतावादी असलेल्या जमात-ए-इस्लामी पक्षाचे यश मानलं जात आहे. जमात-ए-इस्लामी आणि त्यांची विद्यार्थी संघटना इस्लामी छात्र शिबीर बांगलादेशातील हिंसाचारात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागेल, असा कुणी विचारही केला नसेल. बांगलादेशातील सद्यस्थितीसाठी इस्लामी पक्षच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. जमात-ए-इस्लामी पक्षाचा इतिहास आणि विचारधारेबाबत जाणून घेऊयात.
शेख हसीना सरकारने काही दिवसांपूर्वीच जमात-ए-इस्लामी आणि तिची विद्यार्थी संघटना इस्लामी छात्र शिबीर यावर दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत बंदी घातली होती. या बंदीमुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक हिंसक झाले आणि परिस्थिती अशी बनली की शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला.
(नक्की वाचा- शेख हसिनांच्या कट्टर विरोधक खालिदा जियांच्या राजकारणाला कशी मिळाली कलाटणी? पुन्हा सत्तेत येणार?)
जमात-ए-इस्लामी सुरुवातीपासून पाकिस्तानपासून बांगलादेशच्या स्वातंत्र्याला विरोध होता. 1971 च्या स्वातंत्र्ययुद्धातही त्यांनी पाकिस्तानी सैनिकांची बाजू घेतली होती. बांगलादेश सरकारने 1971 मधील जमात-ए-इस्लामीच्या भूमिकेचा उल्लेख पक्षावर बंदी घालण्याच्या चार कारणांपैकी एक म्हणून केला. यानंतर बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेले आंदोलन हिंसक झाले.
जमात-ए-इस्लामीची पाकिस्तान धार्जिणी भूमिका
जमात-ए-इस्लामी हा बांगलादेशमधील कट्टरतावादी पक्ष आहे. बांगलादेशला पाकिस्तानपासून कधीही स्वातंत्र्य मिळू नये, अशी या पक्षाची भूमिका होती. जमात-ए-इस्लामीवर बंदी बांगलादेशच्या पहिल्या मुजीबूर रहमान सरकारच्या काळात सुरू झाली होती. हा पक्ष माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा समर्थक आहे. त्यामुळे बांगलादेशच्या नव्या सरकारमध्ये जमात-ए-इस्लामीचाही समावेश होऊ शकतो, असे मानले जात आहे.
(नक्की वाचा- शेख हसीना यांच्या आयुष्यातील सर्वात खडतर 45 मिनिटं, वाचा सत्ता सोडण्यापूर्वी नेमकं काय झालं?)
जमात-ए-इस्लामीची मुळे भारताशी जोडलेली आहेत. ब्रिटिश राजवटीत अविभाजित भारतात 1941 मध्ये पक्षाची स्थापना झाली. जमात-ए-इस्लामीच्या देशविरोधी कारवाया पाहता बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने त्यांची नोंदणी रद्द केली होती.
जमात-ए-इस्लामीच्या निशाण्यावर हिंदू
जमात-ए-इस्लामी, नावाप्रमाणेच, एक कट्टरतावादी पक्ष आहे आणि त्याचे लक्ष्य नेहमीच बांगलादेशात राहणारे हिंदू राहिले आहेत. जमात-ए-इस्लामीच्या अनेक नेत्यांवर हिंदूंवरील हिंसाचाराचे गुन्हे दाखल आहेत. बांगलादेशातील स्वयंसेवी संस्थांच्या अंदाजानुसार, 2013 ते 2022 पर्यंत बांगलादेशात हिंदूंवर 3600 हून अधिक हल्ले झाले आहेत. यातील बहुतांश हल्ल्यांमध्ये जमात-ए-इस्लामीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जमात-ए-इस्लामी पक्ष सत्तेवर आल्यास त्यांच्या भूमिका भारतासाठी डोकेदुखी ठरु शकतात.