अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी परदेशी चित्रपटांवर 100 टक्के शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेतील चित्रपट उद्योग खूप वेगाने संपत चालला आहे. ही बाब अमेरिकेसाठी चांगली गोष्ट नाही. असं ट्रम्प यांनी सांगितलं. इतर देश विविध प्रकारची प्रोत्साहन देऊन चित्रपट निर्माते आणि स्टुडिओला अमेरिकेपासून दूर करत असल्याचा आरोप ही त्यांनी केला. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल' वर लिहिले आहे की "अमेरिकेतील चित्रपट उद्योग वेगाने संपत चालला आहे. इतर देश आमच्या चित्रपट निर्मात्यांना आणि स्टुडिओला अमेरिकेपासून दूर करण्यासाठी अनेक प्रकारची प्रलोभने देत आहेत. हॉलिवूडच्या अनेक गोष्टी उद्ध्वस्त होत आहेत. हा इतर देशांचा सुनियोजित प्रयत्न आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे. असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात बॉलिवूडचे चित्रपट प्रदर्शित होतात. त्यामुळे या निर्णयाचा थेट फटका बॉलिवूडला ही बसणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ते पुढे म्हणाले, की यातून आम्हाला जगाला संदेश द्यायचा आहे. त्यामुळेच अशा सर्व चित्रपटांवर 100 टक्के शुल्क लावण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले असल्याचे ते म्हणाले. जे चित्रपट परदेशात बनले आहेत आणि आपल्या देशात येत आहेत यांच्यावर हे शुल्क आकारले जाईल. आम्हाला अमेरिकेत पुन्हा चित्रपट बनवायचे आहेत." रविवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूडमध्ये चित्रपट निर्मितीतील प्रमाण घटले असल्याचं म्हटलं आहे. याला कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूजॉम जबाबदार असल्याचं ही ट्रम्प म्हणाले.
इतर देश अमेरिकेकडून चित्रपट आणि चित्रपट निर्मितीचे तंत्र चोरत आहेत. ट्रम्प म्हणाले, "जर ते अमेरिकेमध्ये चित्रपट बनवण्यासाठी तयार नसतील, तर चित्रपट आल्यावर आपण शुल्क लावले पाहिजे." एका अहवालानुसार, बजेटमधील कपात आणि बाहेर अधिक आकर्षक कर सवलतींमुळे कॅलिफोर्नियामध्ये चित्रपट निर्मिती कमी झाली आहे. याव्यतिरिक्त, अलीकडच्या वर्षांत अमेरिकन चित्रपट उद्योगाला अनेक आर्थिक धक्के बसले आहेत. ज्यात हॉलिवूड कामगार संप आणि कोविड महामारीचा समावेश आहे असं ही ते म्हणाले.
जानेवारीमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकेचे तीन चित्रपट स्ट्रार जॉन व्हॉइट, मेल गिब्सन आणि सिल्वेस्टर स्टेलोन यांची हॉलिवूडचे विशेष दूत म्हणून नियुक्ती केली होती. ट्रम्प म्हणाले की त्यांचे काम हॉलिवूडमध्ये व्यवसाय परत आणणे आहे, कारण गेल्या चार वर्षांत विदेशी चित्रपटांमुळे या उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. हे तिन स्टार माझ्यासाठी विशेष दूत म्हणून काम करतील. जेणेकरून हॉलिवूड पुन्हा एकदा रुळावर येईल. शिवाय तो पूर्वीपेक्षा अधिक चांगला आणि मजबूत होऊ शकेल. असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. या बातमीचे संपादन एनडीटीव्ही टीमने केलेले नाही. ही सिंडिकेट फीडवरून थेट प्रकाशित करण्यात आली आहे.