इस्रायलच्या दोन मोठ्या शत्रूंचा गेल्या 24 तासांमध्ये सफाया झाला आहे. लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये हेजबुल्लाहचा फऊद शुकर (Fuad Shukr) आणि इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हानिया (Hamas Chief Ismail Haniyeh) ची हत्या झाली आहे. शुकरच्या हत्येची जबाबदारी इस्रायलनं घेतलीय. हानियाला देखील इस्रायलच ठार केलंय, असं मानलं जात आहे. याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणतंही वक्तव्य आलेलं नाही. पण, इराणी मीडियानं हानियाच्या हत्येचं खापर इस्रायलवरच फोडलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सनं हानियाच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. IRGC नं याबाबत एक वक्तव्य प्रसिद्ध केलंय. त्यानुसार 'तेहरानमधील हानियाच्या घरात त्याला लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात हमास प्रमुख इस्माईल हानिया आणि त्याच्या बॉडीगार्डची हत्या झाली आहे. एका स्फोटात या दोघांची हत्या झाल्याचं IRGC नं स्पष्ट केलंय.
विशेष म्हणजे इस्माईल हानिया मंगळवारी सकाळीच इराणचे नवे अध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होता. या कार्यक्रमात त्यानं इराणच्या सर्वोच्च नेत्याची भेट घेतली होती. त्यानंतर काही तासांनीच त्याच्यावर हा हल्ला झाला.
कोण होता इस्माईल हानिया ?
इस्माईल हानियाचा जन्म 1962 साली गाझापट्टीतील एका निर्वासित शिबीरामध्ये झाला. तो 2017 साली हमास संघटनेचा प्रमुख बनला. त्यानंतर त्यानं गाझापट्टी सोडली होती. हमास प्रमुख होण्यापूर्वी त्याला 2006 साली पॅलिस्टाईन प्राधिकरणाचा पंतप्रधान म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. त्याला 2017 साली अमेरिकेनं जागतिक दहशतवादी जाहीर केलं होतं. हमास प्रमुख झाल्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये गाझा पट्टी सोडली. हमासनं गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी त्याच्याच नेतृत्त्वाखाली इस्रायलवर क्षेपणास्त्र टाकली होती.
( नक्की वाचा : इस्रायलचा गाझामधील शाळेवर Air Strike! 30 जणांचा मृत्यू, 100 पेक्षा जास्त जखमी )
हानियाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी
- इस्माईल हानिया पॅलेस्टाईन नेता होता.
- तो कतारची राजधानी दोहामधून कामकाज करत असे.
- हानियानं 2017 साली खालिद मेशालचा उत्तराधिकारी म्हणून हमासची सूत्रं स्विकारली
- हानियाच्या ये-जा वर इजिप्तनं बंदी घातली होती.
- एप्रिल 2024 मध्ये हानियाच्या 3 मुलांना इस्रायलनं ठार केलं होत.
हमासमध्ये कधी सहभागी?
इस्माईल हानिया 1987 साली हमासमध्ये सहभागी झाला. तो 2017 साली हमासचा मुख्य राजकीय नेता झाला. हमासचे निर्णय घेणारी सर्वात मोठी संस्था शूरा परिषदेनं 2021 साली त्याची चार वर्षांसाठी पुन्हा एकदा या पदावर नियुक्ती केली होती. हमासचा प्रमुख असल्यानं तो इस्रायला कट्टर शत्रू होता. आता त्याची हत्या झाली आहे.