मराठी खासदाराने अमेरिकेत निवडणुकीसाठी उभारला 50 लाख डॉलर्सचा निधी

ठाणेदार यांचे बालपण कष्टात गेले होते. बेळगावात रस्त्याच्या कडेला ते आपल्या कुटुंबासह कच्च्या घरात राहायचे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

अमेरिकेतील मराठमोळे खासदार श्री. ठाणेदार हे पुन्हा एकदा खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी त्यांनी आतापर्यंत 50 लाख अमेरिकी डॉलर्सची रक्कम उभी केली आहे. ठाणेदार यांना 15 हून अधिक पदाधिकारी आणि विविध संघटनांनी निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. या घडामोडींमुळे त्यांचे पारडे अधिक जड झाल्याचे सांगितले जात आहे. 2022 साली झालेल्या निवडणुकीत मिशिगन मतदारसंघातून डेमोक्रॅट पक्षातर्फे ठाणेदार हे निवडून आले होते. ठाणेदारांच्या निवडणूक पथकातील सदस्यांनी बुधवारी बोलताना सांगितले की, 50 लाख डॉलर्सहून अधिक रक्कम उभी झाली आहे.  

ठाणेदार यांच्या कार्यालयाकडून ठाणेदार यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "विविध समुदाय, सामाजिक संघटनांकडून मिळालेला अभूतपूर्व पाठिंबा पाहून मी भारावून गेलो आहे."

मिशिगनच्या नागरिकांना विविध प्रकारच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांची प्रगती व्हावी आणि समानतेसाठीचा आपला संघर्ष यापुढेही सुरू ठेवू असे ठाणेदार यांनी सांगितले आहे. ठाणेदार यांना खासदार एमी बेरा, ज्युडी सी, रॉबर्ट गार्सिया, मार्सी कप्तूर, रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती, टेड लिऊ, सेठ मॅगझिनर, ब्रॅड शर्मन, दिना टायटस यांनी पाठिंबा दिला आहे.  ‘ह्युमन राइट्स कॅम्पेन', ‘लेबरर्स इंटरनॅशनल युनियन ऑफ नॉर्थ अमेरिका' (LIUNA), ‘नॅशनल एज्युकेशन असोसिएशन', ‘मिशिगन एज्युकेशन असोसिएशन' आणि ‘न्यूटन ॲक्शन अलायन्स' या संघटनांनीही ठाणेदारांना पाठिंबा दिला आहे.

Advertisement

श्री ठाणेदार यांचे पूर्ण नाव श्रीनिवास ठाणेदार असून ते मूळचे बेळगावचे आहेत. ठाणेदार यांनी अमेरिकेमध्ये कॉकस नावाच्या एका गटाची स्थापना केली आहे. विविध धर्माच्या लोकांचे हित जपण्यासाठी या गटची स्थापना करण्यात आली असून यामध्ये  हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांच्या अनुयायांचा समावेश आहे. या धर्माच्या लोकांचे हित जपण्याच्या उद्देशाने हा गट स्थापन करण्यात आला होता. 29 सप्टेंबर 2023 रोजी ठाणेदार यांनी या गटाची स्थापना केली होती.  धार्मिक भेदभावाच्या, द्वेषाच्या विरोधात हा गट सुरू करण्यात आल्याचे ठाणेदार यांनी सांगितले होते. 

Advertisement

ठाणेदार यांचे बालपण कष्टात गेले होते. बेळगावात रस्त्याच्या कडेला ते आपल्या कुटुंबासह कच्च्या घरात राहायचे. घरात नळाला पाणी नव्हतं मात्र पावसाळ्यात घराचं छप्पर गळायचं असं ठाणेदार यांनी सांगितले होते. ठाणेदार यांच्या वडिलांनी त्यांना सातत्याने पाठिंबा दिला. घरच्या परिस्थितीमुळे ठाणेदार यांना वयाच्या 14 व्या वर्षापासून काम करावं लागलं होतं. 14 वर्षांचा असताना मी कार्यालयांमध्ये साफसफाईचे काम करायचे असे त्यांनी सांगितले आहे. शिक्षणात हुशार असलेल्या ठाणेदार यांनी मुंबईतून रसायनशास्त्र विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. सुरुवातीला काही कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी औषध निर्माण करणारी कंपनी स्थापन केली होती. अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर 2018 साली ठाणेदार मिशिगनच्या गव्हर्नर पदाच्या निवडणुकीत उभे राहिले होते मात्र ते पराभूत झाले. 2020 साली त्यांनी मिशिगनमधून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि 2022 मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. दोन्ही निवडणुकांमध्ये ते विजयी झाले होते. 

Advertisement
Topics mentioned in this article