अमेरिकेतील मॅरीलँड राज्यातील कोलंबिया येथे 27 वर्षीय भारतीय तरुणी निकिता गोडीशाला हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी तिचा माजी रूममेट अर्जुन शर्मा याच्यावर हत्येचा संशय असून, निकिताच्या वडिलांनी या हत्येमागे प्रेमाचा कोणताही अँगल नसून आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
"बॉयफ्रेंड नाही, तर तो रूममेट होता"
हैदराबादमध्ये माध्यमांशी बोलताना आनंद गोडीशाला म्हणाले,"माझी मुलगी 4 वर्षांपूर्वी कोलंबियाला गेली होती. आरोपी अर्जुन शर्मा तिच्यासोबत रूममेट म्हणून राहायचा. तो तिचा एक्स-बॉयफ्रेंड असल्याच्या बातम्या खोट्या आहेत."
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
"निकिता आणि अर्जुन एकाच अपार्टमेंटमध्ये 4 जण मिळून राहत होते. अर्जुनने निकिताकडून वारंवार पैसे उसने घेतले होते. अर्जुन भारतला परतण्याची योजना आखत होता. त्यामुळे निकिताने त्याला आपले पैसे परत मागितले, या कारणावरून संतापलेल्या अर्जुनने तिची हत्या केली आणि तो भारतात पळून गेला", असा दावा आनंद गोडीशाला यांनी केला.
4500 डॉलर्सचा व्यवहार
मिळालेल्या माहितीनुसार, निकिताची चुलत बहीण सरस्वती हिने भारतीय दूतावासामध्ये तक्रार दाखल केली आहे. अर्जुनने निकिताकडून एकूण 4,500 डॉलर (अंदाजे 4 लाख रुपये) उसने घेतले होते. त्याने 3,500 डॉलर परत केले होते, मात्र उर्वरित 1,000 डॉलर परत करण्यास त्याने नकार दिला होता. निकिताला समजले होते की, अर्जुनने इतर अनेक लोकांकडूनही कर्ज घेतले आहे आणि तो भारतला कायमचा पळून जाण्याच्या तयारीत आहे.
(नक्की वाचा- Badlapur News: बदलापुरात रात्रीच्या वेळी भयंकर घडतंय, धडकी भरवणारा VIDEO आला समोर)
31 डिसेंबरचा शेवटचा फोन
निकिताने शेवटचा फोन 31 डिसेंबर 2025 च्या रात्री केला होता. तिने वडिलांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तोच तिचा शेवटचा कॉल ठरेल, असे वडिलांना स्वप्नातही वाटले नव्हते.
न्याय आणि मृतदेहाची मागणी
"ज्या नराधमाने माझ्या मुलीचा बळी घेतला, त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. मी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती करतो की, माझ्या मुलीचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी मदत करावी," अशा शब्दांत आनंद गोडीशाला यांनी आपले दुःख व्यक्त केले.