संजय तिवारी, प्रतिनिधी
Nagpur News : नागपूर येथील एम्स (AIIMS) रुग्णालयाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या मेसमध्ये मिळालेल्या रात्रीच्या जेवणात किडे आणि तळलेली अळी (Caterpillar) सापडल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. २५ फेब्रुवारी बुधवारी रात्रीचं जेवण करीत असताना काही विद्यार्थ्यांच्या ताटात अशा प्रकारचे जीव सापडल्याचं सांगितलं जात आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
विद्यार्थ्यांच्या तक्रारी
काही विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या एका ताटात तळलेली अळी सापडली. तर फळांच्या फोडींवर मेलेला किडा दिसला. भाजीमध्ये माशीसारखा पदार्थ आढळला, तर मशरूमच्या रश्श्यात स्पंजसारखा संशयास्पद पदार्थ सापडल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. हे सर्व आरोप सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. काही विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की, त्यांच्या मित्रांनी जेवण अर्धे संपवल्यानंतर ही घाण त्यांच्या लक्षात आली. ज्यामुळे आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
महाविद्यालयाकडून स्पष्टीकरण...
याबाबत महाविद्यालयाने स्पष्ट केलं की, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. केवळ सोशल मीडियावरील फोटोंच्या आधारे हे आरोप केले जात आहेत. तरीही, तथ्यांची पडताळणी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. एम्स प्रशासनाने सांगितलं की, संस्थेतील सर्व शिक्षक, डीन आणि वरिष्ठ अधिकारी देखील याच मेसमध्ये जेवण करतात. स्वच्छतेबाबत एम्सचे धोरण अतिशय कडक (Zero Tolerance) आहे. मेसचं काम पाहणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध दोष सिद्ध झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. काही विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांनी यात 'खोडसाळपणा' असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. कारण ही बाब सोशल मीडियावर व्हायरल होण्यापूर्वी किंवा नंतर कोणतीही औपचारिक तक्रार करण्यात आली नव्हती.
विद्यार्थी परिषदेच्या (Student's Council) सदस्यांनी प्रशासनाला पत्र लिहून कळवले आहे की, त्यांना विद्यार्थ्यांकडून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही आणि त्यांनी स्वतःदेखील प्रशासनाकडे तक्रार केलेली नाही. विद्यार्थ्यांनी मर्यादित जागा आणि जेवण वाढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या गर्दीबद्दलही तक्रार केली आहे. प्रशासनाने मान्य केले की एका काउंटरवर कर्मचारी नव्हता, ज्यामुळे गर्दी वाढली होती. याप्रकरणी कंत्राटदाराला तातडीने सुधारणा करण्याची ताकीद देण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world