अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणला अणुबॉम्ब मिळू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर रशियाचे प्रमुख पुतिन यांच्या खास व्यक्तीने दिले आहे. त्यामुळे इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध शांत होण्या ऐवजी आणखी भडकण्याची दाट शक्यता आहे. त्यात जर इराणकडे अण्वस्त्र आली तर इस्रायल आणि अमेरिकेचेही टेन्शन वाढणार आहे. अण्वस्त्र इराणला देण्याबाबत रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यांनी आपल्या सोशल मीडियावर मोठा दावा केला आहे. रविवारी इराणच्या अणु ठिकाणांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर अनेक देश आता इराणला अण्वस्त्र देण्यासाठी तयार आहेत असा दावा त्यांनी केला आहे. शिवाय इराणच्या इस्फाहान, नतांझ आणि फोर्डो येथील तीन अणू केंद्रांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे त्याचे विपरीत परिणाम झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साध्या जे करत आहेत, अगदी त्याच्या उलट सर्व गोष्टी होत आहेत असं ही दिमित्री मेदवेदेव यांनी स्पष्ट केलं.
अनेक देश इराणला थेट आपले अणुबॉम्ब पुरवण्यासाठी तयार आहेत असं मेदवेदेव म्हणाले. मेदवेदेव हे रशियाचे प्रमुख पुतीन यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. त्यामुळे त्यांनी केलेले हे वक्तव्य मोठे समजले जाते. यांनी 2020 पासून रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांनी पुढे म्हटले की इराण या लढ्या विरोधात एकसंध असल्याचं सांगितलं आहे. इराणची जनता एकत्र आहे. मेदवेदेव यांनी एकापाठोपाठ एक दहा ट्विट करून अमेरिकेने केलेले हल्ले निष्प्रभ असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान ट्रम्प हे इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा करणार आहेत असं ही बोललं जात होतं. दरम्यान अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत निषेध केला होता. मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले, इराणवर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला तो बेजबाबदार पणचा होता. या हल्ल्यासाठी काही कारणं दिली असली तरी ते आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे रशियाने म्हटले होते. सर्वस्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी रशिया प्रयत्न करेल असं ही या निवेदनात म्हटलं होतं.