अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump) यांनी ओहियोचे सिनेटर जेडी वेन्स यांची उपराष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून (JD Vance chosen as the vice presidential candidate) घोषणा केली आहे. एकेकाळी वेन्स माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे टीकाकार राहिले आहे. 2016 मध्ये ट्रम्प यांचे कट्टरविरोधक होतं. ट्रम्प म्हणजे अमेरिकेचे हिटलर असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. मात्र हळूहळू ते ट्रम्प यांच्या जवळ आले आणि त्यांचं समर्थन करू लागले. ट्रम्प यांनी वेन्स यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, बऱ्याच चर्चेनंतर निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्षपद सांभाळण्यासाठी स्टेट ऑफ ओहियोचे सिनेटर जेडी वेन्स योग्य उमेदवार आहेत.
जेडी वेन्स अवघे 39 वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1984 रोजी झाला. ओहियोमधील आर्थिक अडचणीत त्यांचं लहानपण गेलं. त्यांच्या आईला दारूचं व्यसन होतं. वडिलांचा लहान वयातच मृत्यू झाला होता. त्यामुळे आजी-आजोबांनीच त्यांचं संगोपन केलं. मात्र बिकट परिस्थितीही त्यांनी कष्ट करीत आपलं आयुष्य मार्गावर आणलं. त्यांनी अमेरिकेत आपली ओळख वाढवली. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी नोकरी केली.2022 मध्ये ते सिनेटवर पहिल्यांदा निवडले गेले, त्याआधी लष्करी मरीन जवान म्हणून इराकमध्ये सेवा देत होते. येल लॉ स्कूलमधून कायद्याचं शिक्षण घेत. सिलिकॉन व्हॅलीत उपक्रम भांडवलदार म्हणूनही काम केलं. कायद्याचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव घेतला.
नक्की वाचा - एका मिलिसेकंदानं वाचला ट्रम्प यांचा जीव, शेवटच्या क्षणी काय घडलं? स्वत: सांगितला अनुभव
जेडी वेन्स यांची पत्नी मूळ भारतीय वंशाची उषा चिलुकुरी...
जेडी वेन्स यांनी मूळ भारतीय वंशाच्या वकील उषा चिलुकुरी यांच्याशी लग्न केलं. उषा या मुळच्या आंध्र प्रदेशच्या आहे. दोघांनी एकत्रितपणे कायद्याचं शिक्षण घेतलं. यानंतर त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 2014 मध्ये हिंदू पद्धतीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यांना इवान, विवेक आणि मीराबेल नावाची मुलं आहे.
हिलबिली एलेजी (Hillbilly Elegy) नावाच्या पुस्तकामुळे त्यांची मोठी प्रसिद्धी झाली. या पुस्तकाच्या माध्यमातून ओहियोमधील मिडलटाऊनमधील एका गरीब भागात वाढलेल्या मुलांच आयुष्य दाखविण्यात आलं आहे. ही कथा अशा एका मुलाची आहे जो विस्कळीत लहानपण, आर्थिक विवंचना पार करीत स्वत:ला गरीबीच्या जंजाळातून बाहेर काढतो. ट्रम्प यांनीही वेन्स यांच्या पुस्तकाचं कौतुक केलं होतं.