Venezuela Earthquakes : व्हेनेझुएला देशात नुकत्याच आलेल्या भूकंपाने हजारो कुटुंबांचे संसार उघड्यावर आणले आहेत. या महाभयंकर आपत्तीमध्ये क्रीडा जगतातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. व्हेनेझुएलाच्या टॉप-फ्लाईट क्लब 'डेपोर्टिव्हो ला ग्वायरा'चा अनुभवी अर्जेंटिनी स्टार डिफेंडर ल्युकास त्रेजो याच्या पत्नी आणि दोन लहान मुलांचा या भूकंपात मृत्यू झाला आहे. ल्युकासचे कुटुंब राहत असलेली निवासी इमारत पत्त्यांसारखी कोसळल्याने हा संपूर्ण प्रकार घडला.
भूकंप झाला तेव्हा ल्युकास त्रेजो हा आगामी फुटबॉल सामन्याच्या तयारीसाठी आपल्या 'मारिटिमो' क्लबसोबत देशाची राजधानी काराकास येथे होता. ज्यामुळे तो या घटनेतून सुखरूप वाचला. मात्र, घरी असलेल्या त्याच्या कुटुंबावर काळाने घाला घातला.
सोशल मीडियावरून केली होती मदतीची याचना
भूकंपाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या याराकुय प्रांतातील प्लाया ग्रांदे या किनारी भागात ल्युकासचे कुटुंब राहत होते. 24 जून रोजी जेव्हा शक्तिशाली भूकंपाचे दोन धक्के बसले, तेव्हा त्यांची बहुमजली इमारत पूर्णपणे कोसळली. कुटुंबाशी संपर्क तुटल्यानंतर ल्युकासने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करून लोकांना मदतीचे आवाहन केले होते.
(नक्की वाचा- मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाला 'शिंग्रोबा' यांचे नाव द्या! मुख्यमंत्र्यांकडे थेट पत्राद्वारे)
त्याने लिहिले होते, "भूकंपाच्या धक्क्यानंतर आमची इमारत कोसळली आहे. मला माझ्या कुटुंबाबद्दल काहीही माहिती नाही. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. मला आशा आहे की ते त्या वेळी इमारतीत नसतील." या आवाहनानंतर स्थानिक स्वयंसेवक आणि व्यावसायिक बचाव पथकांनी शोधमोहीम सुरू केली होती, परंतु अखेर ढिगाऱ्याखालून त्यांचे मृतदेह हाती आले.
फुटबॉल क्लबकडून अधिकृत शोककळा जाहीर
ल्युकास त्रेजोच्या या न भरून येणाऱ्या नुकसानावर त्याच्या 'डेपोर्टिव्हो ला ग्वायरा' या फुटबॉल क्लबने अधिकृत निवेदन जारी करत तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
व्हेनेझुएलात भूकंपामुळे सुमारे 1000 मृत्यू
संयुक्त राष्ट्राच्या (UN) स्थलांतर एजन्सीने शनिवारी जाहीर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, 24 जून रोजी झालेल्या या दुहेरी भूकंपाची तीव्रता एवढी भयानक होती की, यामुळे व्हेनेझुएलातील 67 लाख लोकांना याचा थेट फटका बसला आहे.