Saudi Arabia Bus Accident: सौदी अरबमध्ये उमराह यात्रेसाठी गेलेल्या भारतीय नागरिकांवर काळाने झडप घातली आहे. मक्का-मदीनाजवळ महामार्गावर एका बसचा भीषण अपघात होऊन बसला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल 45 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये एकाच कुटुंबातील 18 जणांचा समावेश होता, जे एकाच बसमध्ये प्रवास करत होते.
मृतदेह भारतात का येणार नाहीत?
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व भारतीयांचे मृतदेह त्यांच्या मायदेशी परत आणले जाणार नाहीत. सौदी अरबमध्येच त्यांच्या धार्मिक रीतीरिवाजांनुसार त्यांचे दफन केले जाईल. यामागे सौदी सरकारने केलेला एक विशिष्ट नियम आहे, ज्यामुळे उमराह यात्रेदरम्यान मृत्यू झालेल्या कोणत्याही व्यक्तीचे पार्थिव त्याच्या मूळ देशात परत पाठवले जात नाही.
उमराह' यात्रेसाठी कठोर नियम
सौदी अरबमधील 'उमराह' मंत्रालयाने (Umrah Ministry) या संदर्भात स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. मक्का-मदीना येथे यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून एक 'डिक्लेरेशन फॉर्म' भरून घेतला जातो. या फॉर्मवर सही केल्याशिवाय कोणालाही यात्रेसाठी प्रवेश मिळत नाही.
( नक्की वाचा : Sheikh Hasina : फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीना ढाक्याला परतणार? बांगलादेशच्या मागणीनंतर भारताकडं काय आहेत पर्याय )
या 'डिक्लेरेशन फॉर्म'मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले असते की, यात्रेदरम्यान सौदीच्या भूमीवर कुणाचा मृत्यू झाला, तर त्याचे दफन सौदी अरबमध्येच केले जाईल आणि मृतदेह त्याच्या देशात परत पाठवला जाणार नाही. याच नियमामुळे या 45 भारतीयांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना परत मिळणार नाहीत आणि त्यांचे अंतिम संस्कार सौदी अरबमध्येच पार पडतील.
काय आहे नियमाला अपवाद?
या नियमाला एक अपवाद आहे. जर एखादी भारतीय व्यक्ती नोकरी (Job) किंवा अन्य खासगी कामासाठी (Private Work) सौदी अरबमध्ये गेली असेल आणि तिथे तिचा मृत्यू झाला, तर मात्र मृतदेह मायदेशी परत आणण्याची परवानगी आहे. अशा परिस्थितीत, मृताच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार मृतदेह भारतात परत आणला जाऊ शकतो किंवा कुटुंबाची इच्छा असल्यास सौदी अरबमध्येच अंत्यसंस्कार केले जातात.
कसं मिळतं डेथ सर्टिफिकेट?
यात्रेदरम्यान मृत्यू झाल्यास, मृतदेह मायदेशी येत नसला तरी 'मृत्यू प्रमाणपत्र' आणि इतर आवश्यक कागदपत्रे मिळवण्याची एक निश्चित प्रक्रिया आहे. एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू होतो, तेव्हा सौदीचे हज मंत्रालय (Haj Ministry) तात्काळ त्या देशाच्या हज मिशनला (Haj Mission) याची माहिती देते. तसेच, ही माहिती सौदीच्या हज मंत्रालयाच्या वेबसाइटवर देखील प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर, संबंधित देशाचे हज कार्यालय या माहितीच्या आधारावर मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे कुटुंबाला उपलब्ध करून देऊ शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world