Snakebite News : एक व्यक्ती आपल्या घराच्या मागच्या बाजूला फिरत असताना अचानक त्याला पायाला काहीतरी चावल्याची जाणीव झाली. त्याने लक्ष देऊन पाहिलं तर एक साप फणा काढून बसला होता. हा साधारण साप नव्हता तर रॅटलस्नेक होता. या सापाने व्यक्तीच्या पायावर अशा धोकादायक ठिकाणी दंश दिला, ज्यामुळे सापाचं विष थेट त्याच्या नसातून रक्तात मिसळलं. काही वेळातच त्याच्या शरीरावर सूज येऊ लागली. त्याच्या शरीरात असं काही घडलं की ते पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी तब्बल ५४ इंजेक्शन दिले. सर्व उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयाने व्यक्तीच्या हातात बिल दिलं. ते पाहून सर्वांना जबर धक्का बसला. याचं बिल तब्बल ११ कोटींवर पोहोचलं होतं.
ही घटना अमेरिकेतली कॅलिफोर्नियाची आहे. पीडित व्यक्तीचं नाव क्रिस होवर्थ आहे. त्या दिवशी तो घराच्या मागच्या बाजूला पाण्याची पाइपलाइन तपासण्यासाठी गेला होता. चालता चालता अचानक त्याला पायाला काहीतरी चावल्याची जाणीव झाली. सुरुवातीला त्याला वाटलं की पायाखाली काटेरी झाडं आलं असेल, मात्र जेव्हा त्याने खाली पाहिलं तर त्याला धक्काच बसला. समोर एक भयानक रॅटलस्नॅक फणा काढून बसला होता आणि सापाने आपला काटा काढल्याचं त्याच्या लक्षात आलं.
क्रिसच्या नसांमध्ये शिरलं सापाचं विष...
डॉक्टरांनुसार, रॅटलस्नेकने क्रिसला एकदाच नाही तर दोन वेळा दंश केला. त्याहून भयावह बाब म्हणजे सापाचे दात क्रिसच्या पायाच्या नसांमध्ये शिरले. थेट नसांमध्ये विष जाणं म्हणजे कोणत्याही अडथळ्याशिवाय विष रक्तात मिसळलं आणि हळूहळू संपूर्ण शरीरात पसरलं.
काही मिनिटात क्रिसची प्रकृती बिघडली. त्याच्या शरीरावर प्रचंड सूज आली. त्याची जीभ सुन्न झाली आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यावेळी डॉक्टरांना लक्षात आलं की, ख्रिसला 'डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोॲग्युलेशन' (DIC) नावाचा एक अत्यंत धोकादायक आणि दुर्मीळ आजार होता.
या आजारात सापाच्या विषामुळे शरीरातील संपूर्ण ब्लड क्लॉटिंग सिस्टिम पूर्णपणे उद्ध्वस्त होतं. यामुळे शरीरातंर्गत रक्तस्त्राव होऊ लागला आणि रक्ताच्या गाठी तयार होऊ लागल्या. शरीरात असं काही घडलं तर कोणाचाही मृत्यू होऊ शकतो.
जवळच्या डॉक्टरांनी त्याला एकामागून एक असे ३६ अँटिव्हेनमचे इंजेक्शन दिले. मात्र तरीही क्रिसच्या शरीरातील विष संपत नव्हतं. रुग्णालयातील अँटीव्हेनम स्टॉपदेखील संपला. शेवटी त्याला स्टॅनफोर्ड रुग्णालयात रेफर करण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी क्रिसला आणखी १८ अँटीव्हेनम इंजेक्शन दिले. असं ५४ इंजेक्शन त्याला देण्यात आले.
रुग्णालयाचं बिल पाहून कुटुंब हादरलं...
या सर्व प्रक्रियेनंतर जे बिल हाती आलं ते पाहून कुटुंबाला जबर धक्का बसला. सर्व रुग्णालयांचं मिळून बिल १३ लाख डॉलर म्हणजे भारतीय रुपयात ११ कोटी इतकं झालं. सुदैवाने क्रिसचा आरोग्य विमा होता. त्यामुळे बिलाची एक मोठी रक्कम कव्हर होण्याची अपेक्षा आहे. मात्र आरोग्य विमानंतर त्यांच्या कुटुंबाला किती रक्कम द्यावी लागेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world