जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांना त्यांचीच कंपनी टेस्ला CEO पदावरुन दूर करण्याच्या तयारीत आहे. 'वॉल स्ट्रीट जर्नल' नं अज्ञात स्रोतांचा हवाला देत एक रिपोर्ट छापलाय. या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
इलेक्ट्रिक कार कंपनी सध्या खराब कालखंडातून जात आहे. त्यामुळे कंपनीच्या बोर्डानं मस्क यांच्या जागी नवा CEO शोधण्याची सुरुवात केली आहे, अशी माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. कंपनीच्या बोर्डानं मार्च महिन्यात CEO ची नियुक्ती करणाऱ्या फर्मशी संपर्क साधला असल्याचंही या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. मस्क यांना कधीपर्यंत पदावरुन दूर करणार? याबाबत कोणतीही माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आलेली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
का आहे नाराजी?
गेल्या काही महिन्यात टेस्ला कंपनीला अनेक धक्के बसले आहेत. यावर्षी पनीचे शेअर्स 45 टक्क्यांपर्यंत घसरले होते. टेस्ला कंपनीच्या बोर्डाचा मस्क यांच्या नेतृत्त्वावरील विश्वास डळमळीत झालाय, असं दिसत आहे. त्यातच मस्क सध्या बरेच व्यस्त आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना व्हाईट हाऊसमधील सरकारी दक्षता विभागाच्या (DOGE) कामासाठी बराच वेळ द्यावा लागतोय.
( नक्की वाचा : देशभर मिळणार थेट उपग्रहातून इंटरनेट कनेक्शन, Starlink मुळे काय होणार आपला फायदा? वाचा सर्व माहिती )
टेस्ला कंपनीला विक्री आणि नफ्यात घट झाल्याचं वृत्त CNN नं मागील आठवड्यात दिलं होतं. कंपनीच्या कमाईमध्ये 71 टक्के घसरण झाली आहे, असा धक्कादायक दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. त्याच दिवशी मस्क यांनी आपण सरकारी काम सोडणार असून टेस्लामध्ये परत जाणार असल्याची घोषणा केली होती.
मस्क यांनी टेस्ला कंपनीमध्ये परतण्याची घोषणा केल्यानंतर कंपनी बोर्डानं CEO बदलण्याची योजना बदलली आहे की नाही? याबाबत वॉल स्ट्रिट जर्नलनं कोणतीही माहिती दिलेली नाही. मस्क तसंच टेस्ला कंपनीनं याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याचं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.