वरिष्ठाने सुट्टी नाकारली, 30 वर्षांच्या महिलेचा ऑफिसमध्येच मृत्यू

या महिलेने आजारपणाची रजा मागितली होती जी नाकारण्यात आली होती. यामुळे ही महिला ऑफिसमध्ये आली होती

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

पुण्यामध्ये कामाच्या ताणामुळे अ‍ॅना सबॅस्टीअन या तरुणीचा मृत्यू झाला होता. यानंतर कामाच्या ठिकाणी टॉक्सिक कल्चरचा (कामासाठी वरिष्ठांकडून होणारा छळ) मुद्दा चर्चेत आला आहे. पुण्यातील ही घटना ताजी असतानाच थायलँडमध्ये एक घटना घडली आहे. एका महिलेचा ऑफिसमध्येच मृत्यू झाला आहे. या महिलेने आजारपणाची रजा मागितली होती जी नाकारण्यात आली होती. यामुळे ही महिला ऑफिसमध्ये आली होती आणि ऑफिसमध्येच तिचा मृत्यू झाला. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

थायलँडमधल्या समुत प्रकान भागामधील एका इलेक्ट्रॉनिक उत्पादने निर्मिती कारखान्यामध्ये ही महिला कामाला होती.  30 वर्षांच्या या महिलेला पोटाचा त्रास होता. तिच्या आतड्याला सूज आल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. महिलेला त्रास होऊ लागल्याने तिने आधी सुट्टी घेतली होती. 5 ते 11 सप्टेंबर पर्यंत ही महिला सुट्टीवर होती. यानंतरही, या महिलेने तिच्या वरिष्ठांना पुन्हा एकदा सुट्टीसाठी विनंती केली होती. 13 तारखेला या ही महिला ऑफिसला गेली होती तेव्हा तिच्या वरिष्ठांनी तिला मेडीकल सर्टिफिकेट जमा करण्यास सांगितले, त्याचवेळी त्याने तिला यापुडे सुट्टी मिळणार नाही असे सांगितले. नोकरी जाईल या भीतीने ही महिला कामावर हजर झाली होती. कामावर येताच अवघ्या 20 मिनिटांत ही महिला कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.  नेक्रोटायजिंग एंट्रोकोलायटीस (Necrotising Enterocolitis) नावाच्या विकाराने ही महिला त्रस्त झाली होती. या महिलेच्या सहकाऱ्यांनी सांगितले की ही महिला विनाकारण कधीही सुट्टी घेत नव्हती. मात्र जेव्हा या महिलेला गरज होती तेव्हा तिला वरिष्ठांनी सुट्टी दिली नाही. 

नक्की वाचा : पुण्यातील 'त्या' महिला कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे व्यवस्थेत मोठा बदल होणार? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

या महिलेच्या मृत्यूनंतर डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने दु:ख व्यक्त करताना फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ही घटना दुर्दैवी असून सदर प्रकरणाची चौकशी केली जाईल असे  कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचे कर्मचारी हे आमच्या यशाचा पाया आहेत. त्यामुळे या आघातामुळे आम्ही उद्ध्वस्त झालो आहेत. कंपनीने हे निवेदन प्रसिद्ध केल्यानंतरही सोशल मीडियावर या कंपनीला आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना शिव्याशाप दिले जात आहेत. 

Topics mentioned in this article