कॅनडामध्ये एक उबर चालक आणि महिला यात्री यांच्यातील संभाषण व्हायरल झालं आहे. उबरमध्ये बसणाऱ्या महिलेनेच हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून या व्हिडीओमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. उबर चालकाने त्याच्या गाडीत बसलेल्या महिलेला म्हटले की जर ती पाकिस्तानात असती तर त्याने आतापर्यंत तिला किडनॅप केले असते. असं सांगितलं जात आहे की हा चालक मूळचा पाकिस्तानातील आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये उबर चालक म्हणताना दिसतोय की, जर तू पाकिस्तानात असतीस तर तुला किडनॅप केलं असतं. कॅनडातील टोरँटोमधील हा व्हिडीओ असून ही महिला गाडीत बसताच ड्रायव्हरने हे वाक्य उद्गारलं. यावर त्या महिलेने चालकाला प्रश्न विचारला की तू माझं अपहरण केलं असतंस? यावर चालक म्हणतो म्हणजे काय? कारण याच्याशिवाय तुला पकडण्याचा, मिळवण्याचा माझ्याकडे दुसरा पर्यायच उरला नसता.
(नक्की वाचा- किर्गिस्तानमध्ये काय घडलं? ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढलं?)
14 मे रोजी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून या चालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या चालकाला तत्काळ कॅनडातून पाकिस्तानात हाकलून दिलं पाहिजे, अशी मागणीही काहींनी केली आहे.
( नक्की वाचा : 'हिंदू मुली हा लुटीचा माल नाही', पाकिस्तानच्या खासदारानं सरकारला सुनावलं, Video )
काहींनी या चालकाची बाजू घेताना म्हटले आहे की, ड्रायव्हरने हे वाक्य उद्गारण्याच्या आधी काय म्हटले होते हे या व्हिडीओमध्ये कळत नाहीये. कदाचित त्याने गंमतीने हे वाक्य म्हटले असेल कारण ती महिला देखील हसते आहे असे एकाने म्हटले आहे. सोशल मीडियावर अनेक गोष्टी अशा असतात ज्या उगाच व्हायरल होत असतात पूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतरच सत्य कळेल अशीही काहींनी प्रतिक्रिया दिली आहे.