US Helicopter Crash: अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या डेल्टा एअरलाईन्सच्या वैमानिकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. स्वतःच्या लग्नानंतर अवघ्या काही तासांतच हनिमूनला जात असताना हेलिकॉप्टर अपघातात या वैमानिकाचा मृत्यू झाला. 26 वर्षांच्या डेव्ह फिजीच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
10 वर्षांचे प्रेम अन् विवाह
मृत डेव्ह फिजीचे वडील जॉर्ज फिजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेव्ह आणि जेस्नी यांची 10 वर्षांपूर्वी 'न्यू टेस्टामेंट चर्च'मध्ये भेट झाली होती. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि शुक्रवारी दोघांनी थाटामाटात लग्न केले. लग्नाचा भव्य रिसेप्शन सोहळा संपल्यानंतर, हे नवविवाहित जोडपे अटलांटा येथील एका हॉटेलमध्ये रात्रीच्या मुक्कामासाठी आणि पुढील हनिमूनच्या प्रवासासाठी 'रॉबिन्सन R66' या हेलिकॉप्टरमध्ये बसले. हे हेलिकॉप्टर 'डीकाल्ब-पीचट्री' विमानतळाच्या दिशेने झेपावले होते. मात्र, दुर्दैवाने ते लँडिंग पॉईंटवर पोहोचू शकले नाही आणि डॉसन काउंटीमधील एका दुर्गम जंगलात माउंट व्हर्नन ड्राईव्हजवळ कोसळले.
(नक्की वाचा- Palghar News: पालघरच्या कोहोज किल्ल्याचं रुप बदललं! ऐतिहासिक तोफांची शान वाढली)
हेलिकॉप्टर अपघात इतक्या दुर्गम भागात झाला की, प्रशासनाला हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी बराच वेळ लागला. या दरम्यान, व्यवसायाने परिचारिका असलेली डेव्हची पत्नी जेस्नी जखमी अवस्थेत तब्बल 6 तास हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडली होती.
पत्नीच्या जवळच जीव सोडला
डेव्हच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा जेस्नीला शुद्ध आली, तेव्हा डेव्हचा मृतदेह तिच्याजवळ होता. त्याचे शरीर पूर्णपणे थंड पडले होते आणि अंगावर रक्त होते. जेस्नी स्वतः नर्स असल्याने डेव्ह आता या जगात नाही, हे तिने ओळखले होते. सध्या ती अटलांटा येथील रुग्णालयात उपचार घेत असून, मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली आहे.
(नक्की वाचा- Pune News: भारतातील ट्रॅफिकवर उपाय! उबर ड्रायव्हरचा सल्ला अन् एक वाक्य ऐकून अमेरिकन फाऊंडर थक्क)
दृश्यमानता कमी असतानाही उड्डाण
या अपघातातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मृत डेव्ह फिजी स्वतः डेल्टा एअरलाईन्समध्ये 'फर्स्ट ऑफिसर' म्हणजेच पायलट होता. त्यामुळे त्याला हवामानाचा अंदाज होता. टेकऑफ करण्यापूर्वी डेव्हने मुख्य हेलिकॉप्टर वैमानिकाला हवामानाची खराब स्थिती आणि 'झिरो व्हिझिबिलिटी' बद्दल चेतावणी दिली होती. "जेव्हा दृश्यमानता शून्य असते, तेव्हा आम्ही कधीही उड्डाण करत नाही," असे डेव्हने त्याला स्पष्ट सांगितले होते. मात्र, हेलिकॉप्टरच्या पायलटने आपण अधिक उंचीवरून उड्डाण करू, असे सांगत हेलिकॉप्टर उड्डाण केले आणि हा भीषण अपघात झाला.
या अपघातात हेलिकॉप्टरच्या मुख्य वैमानिकाचाही जागीच मृत्यू झाला आहे. सध्या अमेरिकेचे 'नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड' (NTSB) या अपघाताचा सखोल तपास करत असून, हेलिकॉप्टर नेमके कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा हवामानामुळे कोसळले, याचा शोध घेतला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world