Iran-US War: जग ज्या शांतता कराराची वाट पाहत होते, तो इस्लामाबादमधील संवाद निष्फळ ठरला आहे. यामुळे अमेरिका आणि इराण आता थेट समोरासमोर आले असून, अमेरिकेने आजपासून इराणची आर्थिक नाडी मानली जाणारी होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) रोखण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इशारा दिला आहे की, "आमच्यावर किंवा शांततापूर्ण जहाजांवर गोळीबार करणाऱ्याला उडवून दिले जाईल."
अमेरिकन लष्कराची 'नाकेबंदी' घोषणा
यूएस सेंट्रल कमांडने स्पष्ट केले आहे की, भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून नाकेबंदी लागू होईल. इराणच्या बंदरांमध्ये प्रवेश करणारी किंवा तिथून बाहेर पडणारी सर्व जहाजे रोखली जातील. गैर-इराणी बंदरांकडे जाणाऱ्या जहाजांना मार्ग दिला जाईल, परंतु त्यांच्यासाठी कठोर सूचना जारी केल्या जातील.
इराणचा अमेरिकेवर आरोप
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. "आम्ही कराराच्या अगदी जवळ होतो, पण अमेरिकेने अचानक अटी बदलण्यास सुरुवात केली," असे अराघची यांनी म्हटले आहे. अमेरिकेचा आरोप आहे की इराण आपली अण्वस्त्र महत्त्वाकांक्षा सोडण्यास तयार नाही. इराणच्या सैन्याने इशारा दिला आहे की, होर्मुजवर आमचे पूर्ण नियंत्रण असून कोणाचेही आव्हान स्वीकारले जाणार नाही.
(नक्की वाचा- US-Iran War : इराणची नवी खेळी! होर्मुजमधून जहाज वाहतूक सुरू होणार, मात्र भारतासह अनेक देशांना फटका बसणार)
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ
या नाकेबंदीच्या बातमीने जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. WTI क्रूड 8 टक्क्यांनी वाढून 104.50 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. तर Brent क्रूड 7 टक्क्यांनी वधारून 102 डॉलरवर गेले आहे.
युद्ध सुरू झाल्यास गॅस आणि इंधनाच्या किमती गगनाला भिडण्याची भीती व्यक्त होत आहे.
काय होणार भारतावर परिणाम?
होर्मुजची सामुद्रधुनी ही भारताच्या तेल आयातीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर ही नाकेबंदी दीर्घकाळ चालली, तर भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात. तसेच, इराणच्या मार्गावरून परतणारे पाकिस्तानी टँकर्स पाहता, या भागात भारतीय जहाजांची सुरक्षा देखील चिंतेचा विषय बनली आहे.