US-Iran War : इराणने अमेरिकेचे एक लढाऊ विमान पाडल्यानंतर अमेरिकन लष्कराने शनिवारी आपल्या बेपत्ता वैमानिकाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ठेवलं आहे. दुसरीकडे, इराणने आपल्या नागरिकांना त्यांनी या वैमानिकाला पकडून द्यावे त्या बदल्यात त्यांना बक्षीस दिले जाईल, असं आवाहन केलं आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, हे विमान अमेरिकेचे 'F-15E स्ट्राईक ईगल' आहे. शुक्रवारी अशा दोन विमानांवर हल्ला झाला होता, ज्यापैकी एका जवानाची सुटका करण्यात आली असून किमान एक जण अजूनही बेपत्ता आहे. सहा आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात अमेरिकेने इराणी हद्दीत विमान गमावण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे युद्धाला नवे वळण मिळू शकते.
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी सुरू केलेल्या या संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशात खळबळ उडाली आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला असून जागतिक बाजारपेठ कोलमडली आहे. प्रमुख व्यापारी सागरी मार्ग बंद झाले आहेत आणि इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देणे सुरूच ठेवले आहे. शनिवारी इराणच्या एका ड्रोनने दुबईतील अमेरिकन टेक कंपनी 'ओरॅकल'च्या मुख्यालयाला लक्ष्य करून नुकसान केले.
विशेष म्हणजे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "आम्ही इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त केले असून हे काम लवकरच संपवू" असे देशाला उद्देशून भाषण दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच ही विमानं पाडण्यात आली आहेत. अमेरिका आणि इस्रायलने इराणची हवाई संरक्षण यंत्रणा संपल्याचा दावा केला होता, जो आता फोल ठरताना दिसत आहे. तसेच, शनिवारी इराणच्या बुशहर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ला झाला, ज्यात एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. या युद्धातील या केंद्रावर झालेला हा चौथा हल्ला आहे.
१. दोन अमेरिकन विमानांवर हल्ले
विमान पाडल्याबाबत व्हाईट हाऊस किंवा पेंटागॉनने अधिकृतरीत्या जास्त माहिती दिलेली नाही. मात्र, पेंटागॉनच्या एका ईमेलनुसार, मध्यपूर्वेत एक विमान पाडल्याची सूचना लष्कराला मिळाली आहे. एका जवानाचा बचाव करण्यात यश आले असले तरी, दुसऱ्या जवानाची स्थिती अद्याप स्पष्ट नाही. ट्रम्प यांनी याबद्दल अधिक बोलण्यास नकार दिला असला तरी, याचा इराणसोबतच्या वाटाघाटींवर परिणाम होणार नाही असे म्हटले आहे. दरम्यान, इराणच्या सरकारी माध्यमांनी असाही दावा केला की अमेरिकेचे 'A-10' हे लढाऊ विमान पर्शियन गल्फमध्ये कोसळले आहे. इराणच्या टीव्ही चॅनेलवरून स्थानिक नागरिकांना "शत्रू वैमानिकाला" पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे आवाहन केले जात आहे. यापूर्वी इराणने केलेली अनेक दावे चुकीचे ठरले असले तरी, यावेळी मात्र परिस्थिती गंभीर दिसत आहे.
२. दुबईत टेक कंपनीवर हल्ला
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने अमेरिकन टेक कंपन्यांवर हेरगिरीचा आरोप करत त्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर शनिवारी दुबईतील ओरॅकल कंपनीच्या इमारतीवर ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यात इमारतीच्या एका कोपऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दुबई सरकारने याला एक 'किरकोळ घटना' म्हटले असून कोणालाही इजा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. याआधी अॅमेझॉनच्या फॅसिलिटीवरही अशाच प्रकारचे हल्ले झाले होते.
३. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण
जागतिक नेत्यांनी इराणचा सागरी मार्गावरील ताबा सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, कारण याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) या विषयावर चर्चा करण्याची शक्यता आहे.युद्ध सुरू झाल्यापासून इराणमध्ये १,९०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. याव्यतिरिक्त आखाती देश, वेस्ट बँक, इस्रायल आणि लेबनॉनमध्येही मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. लेबनॉनमध्ये तर १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १० लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. अमेरिकेचेही १३ जवान या संघर्षात शहीद झाले आहेत
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world