अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबल्यानंतर जगभरातील बाजारपेठेने सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र, जगातील सर्वात महत्त्वाचा ऊर्जा व्यापारी मार्ग मानल्या जाणाऱ्या 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' परिसरात पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली आहे. सोमवार, 6 जुलै रोजी ओमानच्या समुद्रात एका व्यापारी तेलवाहू टँकरवर अज्ञात वस्तूने (प्रोजेक्टाईल) हल्ला केला, ज्यामुळे जहाजाला आग लागली.
ब्रिटिश सागरी सुरक्षा एजन्सी 'युनायटेड किंगडम मॅरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स'ने या घटनेची अधिकृत माहिती दिली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात नुकतीच युद्धबंदी झाली असून कायमस्वरूपी शांतता करारासाठी प्रयत्न सुरू असतानाच हा हल्ला झाल्याने आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हॉर्मुझजवळ नेमके काय घडले?
UKMTO ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ओमानमधील 'लिमाह' या ठिकाणापासून 8 नॉटिकल मैल पूर्वेला घडली. दक्षिण दिशेकडे जात असलेल्या एका मोठ्या तेलवाहू टँकरच्या डाव्या बाजूला एका अज्ञात वस्तूची थेट धडक बसली. या धडकेनंतर जहाजावर अचानक आग भडकली.
UKMTO WARNING 080-26 - ATTACK
— UKMTO Operations Centre (@UK_MTO) July 6, 2026
Click here to view UKMTO Products⤵️ https://t.co/Oc7hGsk3Do#MaritimeSecurity #MarSec pic.twitter.com/uK8cm9a76M
(नक्की वाचा- Mumbai-Pune Missing Link: प्रवाशांसाठी खूशखबर! पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी पुन्हा खुला)
जीवितहानी टळली
सुदैवाने या हल्ल्यात कोणत्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला नाही, तसेच पर्यावरणाला हानी पोहोचल्याचे वृत्त नाही. वृत्तसंस्था 'एएफपी'ने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा अधिकारी या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. परिसरातून प्रवास करणाऱ्या इतर जहाजांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीची माहिती तात्काळ UKMTO ला देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
इराण-अमेरिका युद्धाचा मुख्य केंद्रबिंदू
मिडल ईस्टमधील युद्धादरम्यान इराणने अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध हॉर्मुझ जलमार्ग हे आपले प्रमुख हत्यार म्हणून वापरले होते. इराणने हा सागरी मार्ग पूर्णपणे ब्लॉक (नाकेबंदी) केला होता आणि अनेक व्यापारी जहाजांवर हल्ले केले होते. ज्यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही नाकेबंदी केली होती आणि इराणवर हवाई हल्ले केले होते.
(नक्की वाचा- Nashik Rain: नाशिक जिल्ह्याला 'रेड अलर्ट'; त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचा इशारा; जिल्ह्यातील सद्यस्थिती काय?)
गेल्या महिन्यातच दोन्ही देशांमध्ये हा धोरणात्मक मार्ग पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या, ज्यानंतर व्यापारी जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू झाली होती.
हॉर्मुझवर आमचेच नियंत्रण राहणार
या नव्या घडामोडींदरम्यान इराणने स्पष्ट आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. "हॉर्मुझ जलडमरूमध्यात युद्धापूर्वीची व्यवस्था आता पुन्हा लागू होणार नाही, आता या मार्गावर आमचेच पूर्ण नियंत्रण असेल," असा दावा इराणने केला आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय जहाजांना केवळ इराणने मंजूर केलेल्या सागरी कॉरिडॉरचाच वापर करावा लागेल, अशी थेट चेतावणीही दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world