डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. अध्यक्षपदाची सूत्रं घेतल्यानंतर पहिल्याद दिवसांपासून ट्रम्प यांनी निर्णयांचा धडका लावला आहे. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाचा हा दुसरा कार्यकाळ आहे. या कार्यकाळात अमेरिकेला जुनं वैभव मिळवून देण्याचा निर्धार ट्रम्प यांनी पहिल्याच भाषणात बोलून दाखवली. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी ड्रिल, बेबी, ड्रिल' (Drill, Baby, Drill) घोषणा केली. या घोषणेची सध्या जगभर चर्चा आहे.
ट्रम्प यांनी या घोषणेनंतर राष्ट्रीय ऊर्जा अणीबाणी (National energy emergency) लागू करण्याची घोषणा केली. त्याचबरोबर जीवाश्म इंधन (Fossil fuels) आणि वीज प्रकल्पांना (Power projects) चालना देण्यासाठी काही लक्ष्य निश्चित करण्याची घोषणा केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे Drill, Baby, Drill ?
'ड्रिल, बेबी, ड्रिल!' ही 2008 साली झालेल्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाची घोषणा होती. मेरीलँडचे माजी गव्हर्नर मायकल स्टील यांनी पहिल्यांदा ही घोषणा दिली होती. त्यानंतर त्यांना रिपब्लिकन नॅशनल कमिटीच्या अध्यक्षपदी निवड केली होती. अतिरिक्त ऊर्जा स्रोत म्हणून पेट्रोलियम आणि गॅसचा वाढत्या ड्रिलिंगला परवानगी देण्याचा निर्धार या घोषणेतून रिपब्लिकन पक्षानं व्यक्त केली. त्यानंतर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार सारा पॉलिन यांनी या घोषणेचा वापर केला. त्यामुळे त्याचा आणखी प्रसार झाला. आता ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्विकारल्यानंतर पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा ही घोषणा दिली आहे. अर्थात यापूर्वी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही ही घोषणा दिली होती.
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अमेरिका येणाऱ्या काळात जास्तीत जास्त तेलाचं उत्पादन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकन नागरिकांसाठी या किंमती कमी करण्याचं आश्वासनही ट्रम्प यांनी दिलंय. त्याचबरोबर अमेरिकेची तेलाची निर्यातही येत्या काळात वाढणार आहे. या क्षेत्रातील रशियाच्या वर्चस्वला शह देण्याची ट्रम्प यांची यामधून योजना आहे.
( नक्की वाचा : $TRUMP Meme Coin : ट्रम्प सत्तेवर येण्यापूर्वी जगभर खळबळ, एक पोस्ट आणि गुंतवणूकदारांना 8000% फायदा )
तेलाच्या किंमती घसरणार?
अमेरिकन अध्यक्षांच्या या घोषणेचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या नव्या धोरणामुळे तेलाच्या किंमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या अध्यक्षीय भाषणानंतरही काही काळ तेलाच्या किंमती घसरल्या होत्या. अमेरिकेच्या ऊर्जा अणिबाणीच्या अधिक तपशीलाची सध्या बाजाराला प्रतीक्षा आहे. त्यानंतर याबाबतचं नेमकं चित्र स्पष्ट होईल.
भारतावर काय परिणाम होईल?
भारत हा कच्चा तेलाचा जगातील तिसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. भारत 85 टक्के तेल आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी होणे ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे. अमेरिका हा सध्या भारताचा पाचव्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश आहे. अमेरिकेचे तेल निर्यातीचे नवे धोरण भारतासाठी फायदेशीर ठरु शकते.