जाहिरात

30 फुटी अजगराच्या तोंडात पाय लटकत होता, बेपत्ता महिलेचे गूढ उकलले

सितेबा गावच्या प्रमुखाने सांगितले की सिरीआती ही मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती

30 फुटी अजगराच्या तोंडात पाय लटकत होता, बेपत्ता महिलेचे गूढ उकलले
अजगराला ठार मारून त्याच्या पोटातून मृतदेह बाहेर काढण्यात आले
इंडोनेशिया:

इंडोनेशियामध्ये 30 फुटी अजगराने एका महिलेला गिळून टाकलं. सिरीआती (30 वर्षे) असं या महिलेचे नाव आहे. ही महिला घरातून बाहेर पडली होती , ती परत आलीच नाही. तिचा शोध घेत असताना तिच्या नवऱ्याला एक अजस्त्र अजगर दिसला होता. या अजगराच्या तोंडातून मानवी पाय बाहेर लटकताना दिसला होता. सिरीआती ही सितेबा गावची रहिवासी होती. सितेबा गावच्या प्रमुखाने सांगितले की सिरीआती ही मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. मुलाला औषध आणण्यासाठी ती घरातून बाहेर पडली होती. ती पहिले तिच्या भावाकडे जाणार होती आणि तिथून औषध आणायला जाणार होती. भावाकडे जाण्यासाठीचा रस्ता दाट जंगलातून जाणारा आहे. सिरीआतीने तिच्या भावाला कळवलं होतं की ती त्याच्या घरी यायला निघाली आहे. सिरीआतीच्या भावाने बराच वेळ वाट बघितली मात्र बहीण घरी न आल्याने त्याने तिच्या नवऱ्याला म्हणजेच 'अदियान्सा'ला फोन केला होता. 

भावाच्या घरी निघाली पण पोहोचलीच नाही

5 मुलांची आई असलेली सिरीआती घरातून बाहेर पडलीय मात्र भावाच्या घरी पोहोचली नाही हे कळाल्यानंतर तिचा नवरा चिंतेत पडला होता. सिरीआती ही दक्षिण सुलावेसी भागातील लुवा रिजन्सीमध्ये जाण्यासाठी निघाली होती. त्याने सिरीआती ज्या दिशेने गेली होती त्या मार्गावर तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.  घनदाट जंगलात त्याने सिरीआतीचा शोध घेण्यास सुरूवात केली. जंगलामध्ये त्याला सिरीआतीच्या पायातील चपला दिसल्या होत्या. तिथून काही अंतरावर त्याला अजगर दिसला ज्याच्या तोंडातून पाय बाहेर लटकताना त्याला दिसला. अदियान्साला काय झाले हे एका सेकंदात कळाले. अजगरानेच आपल्या बायकोला गिळले असावे हा त्याला अंदाज आला जो खरा ठरला. 

करकचून आवळलं मग गिळून टाकलं

जंगलातून जात असलेल्या सिरीआतीवर अजगराने पहिले हल्ला केला आणि तिला करकचून विळखा घातला. या विळख्यामुळे तिचा मृत्यू झाला. यानंतर अजगराने सिरीआतीला गिळून टाकले. अदियान्साला कुठेतरी आशा वाटत होती की आपली पत्नी जिवंत असेल. यामुळे त्याने अजगराला ठार मारले आणि पोटातून सिरीआतीला बाहेर काढले. मात्र सिरीआतीचा मृत्यू झाला होता. सिरीआतीवर गावात नेल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की सिरीआतीचा मृत्यू हा करकचून आवळल्याने झाला. तिच्या शरीरातील हाडे तुटली होती. सिरीआतीच्या पायाला जखम दिसून आली होती जी अजगराच्या चाव्यामुळे झाली होती, याव्यतिरिक्त तिच्या शरीरावर कोणतीही जखम दिसून आली नाही. 

महिन्याभरापूर्वी आणखी एका महिलेला गिळले होते

मानवाला जिवंत गिळल्याची ही नजीकच्या काळातील इंडोनेशियातील दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात 20 फुटी अजगराने 55 वर्षांच्या फरीदाला गिळले होते. फरीदा घरी न आल्याने तिच्या नवऱ्याने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. काही वेळानंतर जंगलामध्ये त्याला अजगर दिसला होता ज्याचं पोट खूप फुगलेलं होतं. नोनीच्या नवऱ्याने गावकऱ्यांसोबत मिळून अजगराला ठार मारलं आणि त्याचं पोट फाडलं. अजगराच्या पोटातून नोनीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. द सन या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com