जाहिरात
This Article is From Apr 30, 2024

पतीला थाटायचा होता दुसरा संसार, पहिल्या पत्नीला जीवे मारण्यासाठी रचला असा डाव

Hingoli Crime News: स्वाक्षरी देत नसल्याने पतीने पत्नीला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पतीसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीला थाटायचा होता दुसरा संसार, पहिल्या पत्नीला जीवे मारण्यासाठी रचला असा डाव

दिनेश कुलकर्णी, हिंगोली 

Hingoli Crime News: हिंगोलीतील बाभुळगावामध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पतीला दुसरे लग्न करायचे होते, यासाठी त्याला पहिल्या पत्नीकडून शपथपत्रावर स्वाक्षरी हवी होती. पण स्वाक्षरी देत नसल्याने पतीने पत्नीला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पतीसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीतील गोरेगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विषारी औषध पाजून मारण्याचा डाव

हिंगोलीतील उमरा गावामध्ये क्रांती श्रीहरी वाबळे या महिलेचा सासरच्या मंडळीकडून छळ सुरू होता. छोट्या-छोट्या गोष्टींवरून तिला मारहाण देखील केली जात असे. यादरम्यान क्रांतीचा पती श्रीहरी वाबळेला दुसरे लग्न करायचे होते, म्हणून त्याने क्रांतीला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. पण पतीच्या दुसऱ्या लग्नास क्रांतीचा विरोध होता, यामुळे तिने शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. यानंतर श्रीहरी वाबळेच्या अत्याचाराने अक्षरशः टोक गाठले. शपथपत्रावर स्वाक्षरी देत नसल्याने त्याने क्रांतीला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सोमवारी (29 एप्रिल) गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

(नक्की वाचा: सावधान! वीज कनेक्शन खंडित होणार सांगत 20 सेकंदात वृद्धाच्या खात्यातून लुटले लाख रुपये)

त्या दिवशी बाभुळगावात नेमके काय घडले?

31 जुलै 2023 रोजी क्रांतीला पतीसह सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढले. घराबाहेर काढल्याने क्रांती आपल्या माहेरी म्हणजेच बाभुळगाव तालुक्यातील सेनगावी परतली. यानंतर श्रीहरी वाबळेसह तीन जणांनी 21 एप्रिल रोजी बाभुळगावात जाऊन क्रांतीला शिवीगाळ करत शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यास मारहाण देखील केली. श्रीहरीला दुसरे लग्न करायचे होते, त्यामुळे त्याला शपथपत्रावर स्वाक्षरी हवी होती. तसेच यापूर्वी दाखल केलेले घटले मागे घेऊन दुसरे लग्न करण्यास परवानगी दे, अशी धमकीही त्याने क्रांतीला दिली.   

धक्कादायक बाब म्हणजे श्रीहरीने स्वतःसोबत विषारी औषधाची बाटलीही आणली होती. हे औषध त्यानं क्रांतीला पाजून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे क्रांती वाबळे घाबरली होती. तिला तातडीने उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. औषधोपचारांनंतर तिनं स्वतः गोरेगाव पोलीस ठाणे गाठत पतीसह तिघांविरोधात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार गोरेगाव पोलिसांनी पतीसह तीन जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गोरेगाव स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत हुंडेकर, जमादार अनिल भारती, बी.एम. खिल्लारे पुढील तपास करत आहेत.

(नक्की वाचा: सुप्रीम कोर्टाने 14 वर्षांच्या मुलीच्या गर्भपाताची परवानगी देणारा आदेश घेतला मागे)

 VIDEO:अमित ठाकरे दिसताच नरेंद्र मोदींनी काय केले?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com