सुनील दवंगे, प्रतिनिधी
Shirdi Saibaba Temple News : यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवात शिर्डीच्या साईबाबांप्रती भक्तांची अपार श्रद्धा पुन्हा एकदा दिसून आली. देशाच्या विविध भागांतून आलेल्या साईभक्तांनी साईचरणी कोट्यवधी रुपयांचे सुवर्ण अलंकार अर्पण करत गुरुदक्षिणेची अनोखी परंपरा जपली. तीन दिवसांच्या उत्सवादरम्यान साईबाबांना साधारण एक किलो 100 ग्रॅमचे सोन्याचे अलंकार दान स्वरूपात प्राप्त झाले. यात सूवर्ण मुकुट,सुवर्ण हार, सुवर्ण ओम, छोटा मुकुट तसेच सुवर्ण साखळी अशा विविध अलंकारांचा समावेश आहे.
गुरुपौर्णिमा हा साईभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जातो. साईबाबांना आपल्या जीवनातील सद्गुरू मानणारे लाखो भक्त या दिवशी शिर्डीत येऊन दर्शन घेतात आणि आपल्या श्रद्धेनुसार गुरुदक्षिणा अर्पण करतात. यंदाही देशभरातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले होते. साईनामाच्या गजरात, भजन-कीर्तन, अखंड साई सच्चरित पारायण आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण साईनगरी भक्तिमय वातावरणाने भारावून गेली.
पहिल्याच दिवशी एक कोटींचा सुवर्ण मुकुट
उत्सवाच्या पहिल्या दिवशी आंध्र प्रदेशातील साईभक्त मल्लादी श्रीनिवासन राव यांनी साईबाबांना सुमारे एक कोटी रुपये मूल्याचा 642 ग्रॅम वजनाचा सूवर्ण मुकुट अर्पण केला. या मुकुटावर अत्यंत आकर्षक नक्षीकाम करण्यात आले असून त्यात सूर्य,चंद्र,नवग्रह,व्याल मूर्ती आणि नवरत्नांची सुंदर जडणघडण करण्यात आली आहे. या मुकुटाने साईबाबांच्या अलंकारात आणखी भर पडली. याच दिवशी साईबाबांच्या चरणी 120 ग्रॅम वजनाचे सुवर्ण ओम आणि एक छोटा सुवर्ण मुकुट देखील दान करण्यात आला.
नक्की वाचा >> सेंट विल्फ्रेड महाविद्यालय व्यवस्थापनाला शिवसेना-युवासेनेचा 7 दिवसांचा अल्टिमेटम, मोठ्या आंदोलनाच्या तयारीत
मुख्य दिवशी 47 लाखांचा सुवर्ण हार
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी मुंबईतील एका साईभक्ताने आपली ओळख गुप्त ठेवत जवळपास 300 ग्रॅम वजनाचा आणि अंदाजे 47 लाख रुपये मूल्याचा सुवर्ण हार साईचरणी अर्पण केला. हे गुप्तदान असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानने दिली. या सुवर्ण हारामुळे गुरुपौर्णिमेच्या उत्सवात सुवर्णदानाची चर्चा अधिक रंगली.
सांगता दिनी चेन्नईहून सुवर्ण साखळीची भक्तिभेट
उत्सवाच्या सांगता दिनीही सुवर्णदानाची परंपरा कायम राहिली. तामिळनाडूतील चेन्नई येथील साईभक्त आर. वेत्री सेल्वी अव्वल राज यांनी 32 ग्रॅम वजनाची आकर्षक नक्षीकाम असलेली सुवर्ण साखळी साईबाबांच्या चरणी अर्पण केली. या सुवर्ण साखळीचे अंदाजे मूल्य 4 लाख 21 हजार रुपये असून, साईबाबांप्रती असलेल्या त्यांच्या नितांत श्रद्धेचे हे प्रतीक मानले जात आहे. उत्सवाच्या सांगता दिनी प्राप्त झालेल्या या सुवर्ण देणगीमुळे भक्तांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
नक्की वाचा >> Amravati News: 15 दिवसांच्या बाळाच्या पोटावर दिले तापलेल्या विळ्याचे 12 चटके, ‘डम्मा' अघोरी प्रकाराचा पर्दाफाश
एक किलोहून अधिक सोन्याची गुरुदक्षिणा
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांतच एक किलो 84 ग्रॅम सोन्याचे अलंकार दान स्वरूपात प्राप्त झाले. त्यानंतर सांगता दिनी मिळालेल्या सुवर्ण साखळीमुळे या सुवर्णदानात आणखी भर पडली. संस्थानच्या नियमानुसार सर्व देणग्यांची नोंद करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
भक्तीचा उत्सव, श्रद्धेची परंपरा
शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून श्रद्धा, सबुरी आणि गुरुभक्तीचा महासोहळा आहे. साईबाबांनी दिलेला “श्रद्धा आणि सबुरी”चा संदेश आजही लाखो भक्तांच्या जीवनाला प्रेरणा देत आहे. यंदाच्या उत्सवात देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातूनही अनेक साईभक्त शिर्डीत दाखल झाले. आकर्षक फुलांची सजावट, पायी पालख्या, अखंड पारायण, भजन-कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण साईनगरी भक्तिमय झाली होती.
यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या सुवर्णदानामुळे शिर्डी पुन्हा एकदा देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. साईभक्तांनी अर्पण केलेले सुवर्ण अलंकार हे केवळ मौल्यवान दागिने नसून, साईबाबांप्रती असलेल्या अढळ श्रद्धा, विश्वास आणि गुरुभक्तीचे जिवंत प्रतीक असल्याची भावना अनेक भक्तांनी व्यक्त केली. गुरुपौर्णिमेच्या या उत्सवाने शिर्डीतील भक्ती, सेवा आणि समर्पणाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world