देवा राखुंडे, बारामती
पुण्यापाठोपाठ विद्येचे माहेरघर बनू पाहणाऱ्या बारामतीत देखील गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंदकॉलेजात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याची दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी धारदार शस्त्राने खून केल्याची घटना समोर आली आहे.
पूर्व वैमनस्यातून ही हत्येची घटना घडली आहे. खून करणाऱ्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. खून करणारे दोघे आणि खून झालेला हे तिघेही बारावीचे विद्यार्थी आहेत.
(नक्की वाचा- Pune News : हत्या की आत्महत्या, 19 वर्षीय तरुणीसोबत पहाटे अडीच वाजता काय घडलं?)
खून झालेला अल्पवयीन विद्यार्थी नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आला होता. मात्र महिनाभरापूर्वी झालेल्या एका क्षुल्लक वादातून आज आपली हत्या होईल याची पुसटशी कल्पना त्याला नव्हती. कॉलेजमधील दोघेजण जुन्या भांडणाचा मनात राग धरून बदला घेण्याच्या इर्ष्येने पेटले होते. यातूनच त्यांनी मित्रावर कोयत्याने सपासप वार केले.
हत्येचं कारण काय?
मागील महिना भरापूर्वी दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून यांच्यात बाचाबाची झाली होती. महिनाभरापूर्वी झालेला हाच वाद आजच्या हत्येचं कारण ठरला आहे. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. खून करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर एकाचा शोध सुरु आहे.
(नक्की वाचा- VIDEO : ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाला मारहाण, शिवसैनिक आक्रमक; घटना CCTV मध्ये कैद)
बारामतीतील वाढती गुन्हेगारी वेळीच आटोक्यात आणण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र तरीही बारामतीतील गुन्हेगारी थांबताना दिसत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.