अमजद खान
लोकलमधील वाढणारी गर्दी ही मुंबईकरांसमोरील मोठी समस्या आहे. नोकरीसाठी दररोजचा प्रवास अपरिहार्य असल्याने धक्काबुक्की करीत, कधी दाराला लटकत उभं राहून चाकरमान्यांना प्रवास करावा लागतो. मुंबई उपनगरातून मोठ्या संख्येने लोक मुंबईत नोकरीसाठी येत असतात. दररोज लाखो लोक लोकलच्या गर्दीत प्रवास करीत आपलं घरं, कार्यालयं गाठत असतात. आतापर्यंत लोकलमध्ये लटकत राहून प्रवास करणाऱ्यांपैकी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दिवा-कोपर दरम्यान धावत्या लोकलमध्ये पडून एका 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रिया श्यामजी राजगोर असं या तरुणीचं नाव आहे. सकाळच्या वेळेत नोकरीवर जाण्यासाठी मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग उपनगरातून मुंबईच्या दिशेने प्रवास करीत असतात. सकाळच्या वेळेत सर्वच लोकल गच्च भरलेल्या असतात. कर्जत-कसाराहून येणाऱ्या लोकल या डोंबिवलीला येईपर्यंत पूर्ण खचाखच भरून जातात. परिणामी डोंबिवलीहून चढण्याची संधीच मिळत नाही. त्याशिवाय डोंबिवली ते सीएसएमटी अशा लोकलचं प्रमाणही कमी असल्याने वेळेत निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवासी गर्दीतून प्रवास करण्याची जोखीम पत्करतात. रियानेही अशीच जोखीम पत्करली आणि तिला जीव गमवावा लागला.
नक्की वाचा - वडाळा- CSMT स्थानकादरम्यान लोकलचा डबा घसरला, हार्बर मार्ग विस्कळीत
डोंबिवली पूर्व येथील श्री संकेत इमारतीमध्ये रिया आपल्या कुटुंबासह राहत होती. तिच्या घरात आई-वडील आणि भाऊ आहेत. रिया ठाण्यातील एका बांधकाम कार्यालयात काम करत होती. डोंबिवलीहून सीएसएमटीची लोकल पकडून ठाण्याला उतरायची. आज सकाळी तिने डोंबिवली रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडली. ती आत शिरण्याचा प्रयत्न करत होती, मात्र लोकलमधील गर्दीमुळे ती दरवाजाजवळच अडकून बसली. दिवा ते कोपर दरम्यान तोल गेल्याने ती लोकल खाली पडली. यातच तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या आधी देखील अनेक प्रवासी डोंबिवली ते कोपर दरम्यान गर्दीचा बळी ठरलेत, त्यामुळे रेल्वे या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रवाशांकडून अनेकदा डोंबिवलीहून सोडण्यात येणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केली जाते. मात्र अद्याप या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकल सेवा कधी वाढवणार असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world