जाहिरात

मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग रखडणार? भूसंपादन प्रक्रियेला स्थानिकांसह शेतकऱ्यांचा विरोध, काय आहेत मागण्या?

धुळे तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित मनमाड-इंदूर (बाळापूर ते पुरमेपाडा) रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग रखडणार? भूसंपादन प्रक्रियेला स्थानिकांसह शेतकऱ्यांचा विरोध, काय आहेत मागण्या?
manmad indore railway line project

नागिंद मोरे, प्रतिनिधी

Manmad-Indur Railway Project : धुळे तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित मनमाड-इंदूर (बाळापूर ते पुरमेपाडा) रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. धुळे तालुक्यातील  बाळापूर, वडजाई, पिंपरी, सावळदे, अवधान, लळींग, रानमळा,आर्वी व पुरमेपाडा या गावांतील बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनमाड-इंदूर (बाळापूर ते पुरमेपाडा)रेल्वेमार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ठाम भूमिका घेतली आहे."जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही,तोपर्यंत शासनाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला,प्रतिनिधीला किंवा भूसंपादन प्रक्रियेला सहकार्य केले जाणार नाही",असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या प्रस्तावित मोबदला हा बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत अपुरा आहे. शासनाचा कोणताही कायदा शेतजमिनीचे योग्य व वास्तव मूल्यांकन करू शकत नाही,असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.जमीन अधिग्रहणामुळे शेतकऱ्यांची शेती,उत्पन्नाचे मुख्य साधन आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह धोक्यात येणार आहे. बागायती व सिंचन सुविधा असलेल्या सुपीक जमिनीचा मोठ्या प्रमाणावर नाश होणार आहे. पर्यायी जमीन,पुनर्वसन किंवा रोजगाराबाबत कोणतीही ठोस व लेखी हमी देण्यात आलेली नाही.संबंधित शेतकरी व ग्रामसभेत सविस्तर चर्चा व सहमती न घेता ही प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

नक्की वाचा >> Explainer :  घाईगडबडीत सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं, राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय भीती होती?

बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कवडीमोल मोबदला

यापूर्वी नरडाणा-बोरविहीर रेल्वेमार्गासाठी झालेल्या भूसंपादनावेळीही बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कवडीमोल मोबदला देण्यात आला होता.अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे तीन तुकडे झाले असून रेल्वेमार्ग शेतजमिनीपेक्षा २० ते २५ फूट उंचीवर गेल्याने गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. एका बाजूने दुसऱ्या बाजूला शेती करण्यासाठी जाणे कठीण झाले आहे. रेल्वेमार्गासाठी केलेल्या मुरूम भरावामुळे पावसाचे पाणी शेतात साचून पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. तसेच शेतातील सुपीक माती वाहून जात असून शेतजमीन नापीक होत असल्याच्या तक्रारीही शेतकऱ्यांनी केल्या.

नक्की वाचा >> दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पुण्यातील बड्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, "अजितदादांची इच्छा.."

"प्रत्येक व्यक्तीला शासकीय नोकरी द्या"

बाळापूर,पिंपरी व अवधान ही गावे महापालिकेच्या हद्दीत असून ती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन व सहा लगत आहेत.उर्वरित काही गावेही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन लगतची असल्याने त्यानुसार मोबदला देण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली. २०१४ मध्ये धुळे महापालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनसाठी बाधित शेतकऱ्यांना प्रति चौरस मीटर आठ हजार रुपये मोबदला देण्यात आला होता.त्याच धर्तीवर सर्व बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा.ज्या शेतजमिनींचे तीन तुकडे झाले आहेत,त्या जमिनींना पूर्णपणे बाजारभावानुसार मोबदला देण्यात यावा.याशिवाय प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com