अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी
Mumbai local crowd : मुंबईतील मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंहांची हत्या झाल्याने प्रवाशांमधील चिंता वाढली आहे. त्या दिवशी आलोक नेहमीपेक्षा लवकर घरी जात होते. या दिवशी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. पत्नीला ते जेवायला बाहेर घेऊन जाणार होते. मात्र अखेर पत्नीचा वाढदिवस साजरा होऊच शकला नाही. या घटनेनंतर लोकलमधली गर्दी कशी कमी करणार, या प्रश्नाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
आलोक सिंह यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला ओमकार शिंदे मरीन लाईन्सच्या एका डायमंड कंपनीत काम करायचा. त्यासाठी कामाला वापरण्यात येणारा चिमटा ओमकार शिंदेच्या खिशात होता. मालाडला उतरल्यावरून ओमकारनं आलोक यांना त्याच चिमट्यानं भोसकलं आणि पळ काढला. आलोक सिंग यांचे वडील अनिल सिंग हे राजनाथ सिंहांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात आहेत. मुलाची ज्यानं हत्या केली त्या ओमकार शिंदेला फाशी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. लोकलमध्ये उभं राहण्यावरुन आलोक सिंग आणि ओमकार शिंदेमध्ये वाद झाला. पोलिसांनी मालाडमधील विविध सीसीटीव्ही तपासून आलोकला अटक केली. कुणाचीही हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा व्हायलाच हवी. मात्र यानिमित्तानं लोकलमधल्या गर्दीची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. लोकलमधली गर्दी कमी करण्याची मागणी यानिमित्तानं जोर धरतेय.
पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे, ट्रान्स हार्बर रेल्वेमधून रोज 80 लाख प्रवास करतात. मुंबईत रोज अडीच हजारांच्या आसपास लोकल धावतात. एका लोकलमधून सुमारे पाच हजार प्रवासी प्रवास करतात. तर चार तासांमध्ये चार ते साडे चार लाख प्रवासी लोकलमधून ये-जा करतात. लोकलवरचा ताण कमी करायचा असेल तर काही उपाय सुचवण्यात आले होते.
काय आहेत उपाययोजना...
- पहिला उपाय म्हणजे कार्यालयांच्या वेळा बदलणे.
- दुसरा उपाय म्हणजे लोकलसंख्या वाढवणे.
- त्यानुसार पश्चिम रेल्वे 2030 पर्यंत 165 अतिरिक्त लोकल सेवा सुरू करणार आहे
- तर मध्य रेल्वे 584 सेवा वाढवणार आहे
- पुढच्या पाच वर्षांत एकूण 749 नवीन लोकल सेवा सुरू होण्याची योजना आहे
- तसंच बहुतांश लोकल्स १५ डब्ब्यांच्या करण्यावरही विचार सुरू आहे
- पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल–बोरीवली सहावी लाईन
- बोरीवली–विरार पाचवी व सहावी लाईन
- कल्याण–कसारा तिसरी व चौथी लाईन
- कल्याण–कर्जत तिसरी व चौथी लाईन टाकण्याचा विचार आहे
लोकलमधील गर्दी कमी होण्यात का होतायेत अडचणी?
लोकलमधली गर्दी कमी करण्यासाठी अशा किमान १० उपायांवर विचार सुरू आहे. यामधल्या पहिल्या उपायाबद्दल... म्हणजे कार्यालयीन वेळा बदलण्याबद्दल सरकारी समितीचा अभ्यास सुरू आहे. एकूण ८० लाख प्रवाशांपैकी बँकांमधल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे आठ लाख आहे. केंद्र-राज्य आणि महापालिका अर्थात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १० लाख तर खासगी कार्यालयांमधल्या नोकरदारांची संख्या १५ लाखावर आहे. तर इतर प्रवासी १२ लाख अशी संख्या आहे. कार्यालयीन वेळांमध्ये बदल केला तर १५ लाख प्रवासी विभागले जातील असा अंदाज आहे. मुंबईतल्या कार्यालयांनी १० ते ६ ही कार्यालयांची वेळ बदलून ती पुढे मागे केली, तर लोकलमधली गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र कार्यालयं आणि नोकरदारसुद्धा या बदलत्या वेळेबद्दल फारसे अनुकूल नाहीत. त्यामुळे लोकलमधला जीवघेणा प्रवास दुर्दैवानं सुरूच राहिलाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world