राहुल कुलकर्णी, पुणे
Pune News : पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या मॉडेल कॉलनी येथील सरकारी बंगल्यातून लाखो रुपयांचे सामान चोरीला गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. अर्धा एकर जागेत पसरलेल्या या बंगल्यात 24 तास सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे असूनही, एसी, टीव्ही, झुंबर, पितळी दिवे, वॉकी-टॉकीज आणि इतर महागड्या वस्तू गायब झाल्या आहेत.
माजी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या सेवानिवृत्तीनंतर, नव्याने नियुक्त झालेले आयुक्त नवल किशोर राम यांच्यासाठी बंगला सुसज्ज करण्याची तयारी सुरू असताना ही बाब उघडकीस आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायब झालेल्या सामानामध्ये चार एयर कंडीशनर (AC), दोन एलईडी टीव्ही, पितळी सजावटीच्या वस्तू, एक कॉफी मशीन आणि वॉटर प्युरिफायरचा समावेश आहे.
(नक्की वाचा- Dadar kabutar Khana News: कबुतरखान्यावरुन दादरमध्ये राडा! जैन समाज आक्रमक, ताडपत्री हटवली, तोडफोड केली)
एफआयआर नाही
पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील वस्तू गहाळ झाल्याची ही घटना उघडकीस आल्यानंतरही अद्याप पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. दरम्यान, महापालिका प्रशासनाने या चोरीला गेलेल्या वस्तूंच्या जागी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी सुमारे 20 लाख खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Mumbai News: लायसन्स कपड्याचे आणि विकत होते दारू, टेलरिंगच्या दुकानात उघडले रेस्टॉरंट)
या बंगल्याची देखभाल आणि सुरक्षा करण्याची जबाबदारी महापालिकेच्या मालमत्ता, बांधकाम आणि सुरक्षा विभागांची आहे. परंतु या गंभीर चुकीची जबाबदारी घेण्यास कोणताही विभाग तयार नाही. यापूर्वी महापौरांच्या सरकारी बंगल्यातूनही एक टीव्ही चोरीला गेला होता. त्या प्रकरणातील आरोपी अजूनही सापडलेला नाही. एवढ्या उच्च-सुरक्षित सरकारी मालमत्तेतून महागड्या वस्तू चोरीला जाणे आणि त्यावर कोणतीही कायदेशीर कार्यवाही न करणे, यामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.