
BMC Action On Living Liquids: लोअर परळ येथील कमला मील परिसरामध्ये स्थित असलेल्या ‘लिव्हिंग लिक्विडस्' या आस्थापनेतील अनधिकृत बांधकाम निष्कासित करुन त्यांचे उपाहारगृहांचे दोन्ही परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिकेने 05 ऑगस्ट 2025 रोजी केली आहे. तळमजला आणि पहिल्या मजल्यावर गारमेंट शॉपच्या ऐवजी रेस्टॉरंट बार व वाईन शॉप आणि तळमजल्यावर टेलरिंग शॉपऐवजी रेस्टॉरंट आणि डायनिंग असा बदल करुन अनधिकृतरितीने कार्यरत असलेल्या ‘लिव्हिंग लिक्विडस्' यांना महानगरपालिका प्रशासनाने ही कारवाई करुन दणका दिला आहे. दरम्यान, ही कारवाई यापुढेही सुरू राहील तसेच इतरही ठिकाणी कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून नमूद करण्यात येत आहे.
कमला मिलमध्ये गैरप्रकारांना ऊत
कमला मिल परिसरातील आयटी पार्कच्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण तसेच अनधिकृतरित्या रेस्टॉरंट, पब आणि बार सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याठिकाणी स्थळ निरिक्षण करुन कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले होते. त्यानुसार, दिनांक 31 जुलै 2025 रोजी कमला मील परिसरातील थेओब्रोमा, मॅकडोनाल्ड्स, शिवसागर हॉटेल, नॅनो'ज कॅफे, स्टारबक्स, बीरा टॅप्रूम, टोस्ट पास्ता बार व बीकेटी हाऊस या ठिकाणी पाडकाम व जप्तीची कारवाई करण्यात आली.
(नक्की वाचा: ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप )
परवानगी टेलरिंगच्या दुकानाची, सुरू केले रेस्टॉरंट
ही धडक कारवाई मोहीम पुढे सुरू ठेवत महानगरपालिकेच्या वतीने दिनांक 04 आणि 05 ऑगस्ट 2025 रोजी कमला मिल परिसरातील ‘लिव्हिंग लिक्विडस्' (मुंबई वाईन्स अँड ट्रेडर्स) या आस्थापनेची संयुक्त पाहणी करण्यात आली. या ठिकाणी तळमजला आणि पहिल्या मजल्यावर गारमेंट शॉपच्या ऐवजी रेस्टॉरंट बार व वाईन शॉप आणि तळमजल्यावर टेलरिंग शॉपऐवजी रेस्टॉरंट आणि डायनिंग, असे रूपांतर केल्याचे आढळून आले. तसेच, चटई क्षेत्र नियमांचे उल्लंघन करुन उघड्या जागेवर आच्छादन आणि गच्चीवर अनधिकृत छत निर्माण केल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे, अनधिकृतरित्या भिंत बांधणे, परस्पर प्रयोजन बदलून शीतगृह बांधणे, दरवाज्यांच्या रचनेत परस्पर बदल करणे, लाकडी आणि काचेच्या भिंती उभारणे यांसह विविध बांधकाम अनियमितता, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण याठिकाणी आढळून आले.
काल नोटीस आज कारवाई
या स्थळ निरिक्षण आधारे, ‘लिव्हिंग लिक्विडस्' (मुंबई वाईन्स अँड ट्रेडर्स) यांना काल कामे थांबवा (स्टॉप वर्क) नोटीस बजावण्यात आली. तर, आज त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच, व्यावसायिक क्षेत्राचा अनधिकृत विस्तार व अनिवार्य अग्निसुरक्षा प्रमाणपत्र न घेता सार्वजनिक सुरक्षिततेला धोकादायक अशा पद्धतीने संचालन केल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘लिव्हिंग लिक्विडस्' यांच्या दोन्ही उपाहारगृहांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत.
( नक्की वाचा: दादर कबूतरखाना पुन्हा सुरू होणार, कबुतरांना खायला घालता येणार )
सार्वजनिक सुरक्षेबाबत तसेच कायद्याच्या अंमलबजावणीबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे. कमला मीलप्रमाणेच इतरही ठिकाणी आढळलेल्या अनियमितता व अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल व ही मोहीम सातत्याने सुरू राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world