जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा एक 'एआय' (AI) व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अजित पवारांच्या आवाजातील हा व्हिडीओ ऐकून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. @adiityaa_19 या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अजित पवार यांचा हुबेहूब आवाज आणि त्यांची खास शैली वापरून एक भावनिक संदेश देण्यात आला आहे.
व्हिडिओमधील हृदयस्पर्शी संवाद
खरंतर मागच्या वेळी मी बोललो होतो, आपला तो संवाद शेवटचा असेल. पण काय करु रे खरंच मला करमत नाहीये इथे. कामाची सवय होती ना, सकाळी लवकर उठून उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून थेट मंत्रालयात जाऊन फाईल्स निकाली काढण्याची ती सवय सुटत नाहीये. आता इकडे निवांत असतो मी. मात्र माझं लक्ष तुमच्याकडे आणि महाराष्ट्राकडेच असतं. आज १३ दिवस झाले, तुम्ही या १३ दिलसात माझं दर्शन घेतलं असेल त्या कलशारुपी. मलाही खूप बरं वाटलं सगळ्यांना भेटून.
पाहा VIDEO
"इथून कुणीच परतीचा प्रवास करू शकत नाही"
अरे बेट्यांनो केवढं प्रेम करता या दादावर तुम्ही. आज मला इथे बसूनसुद्धा सभेत ऐकू येणारे 'लव्ह यू दादा'चे आवाज ऐकू येतात. अरे बेट्यांने आता मी अशा ठिकाणी आलोय जिथून आजवर कुणीच परतीचा प्रवास करू शकलं नाही. बंद करा स्वत:ला खोटी आशा देणं. नियतीचा हा खेळ आपण नाही बदलू शकत. कधी कधी वाटतं अजून काही वेळ मिळायला पाहिजे होता. जाता जाता तुम्ही घट्ट मिठी मारून निरोप घेतला असता. काळजी नका करू मी सुखरुप पोहोचलोय इकडे.
(नक्की वाचा- Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी)
"सुनेत्राच्या हातची पुरणपोळी आठवते"
सुनेत्रा खरंच तुझ्या हातची पुरणपोळी, साबुदाणा खिचडी आठवतीय. ती चव इकडे कुठे मिळणार. इकडे आम्ही सगळे सोबत असतो. बाळासाहेब आहेत, विलासराव आहेत, आपले आबा आहेत, गोपीनाथ साहेब पण असतात. परवाच आमचं बोलणं झालं.
विलासराव विचारत होते अरे अजित कसा आहे रे माझा रितेश? आबा पण कौतुकाने बोलले माझा रोहित आता परिपक्व नेता झालाय. लोकांसाठी झडतोय, जनतेची कामं करतोय. पण इकडे आल्यावर सगळ्यांच्या मनात एकच खंत होती. अरे अजित ही वेळ होती का इकडे यायची? महाराष्ट्राचा विकास अजून वेगाने पुढे न्यायचा होता. तिथं तुझी आज सर्वात जास्त गरज होती.
(नक्की वाचा- Big News: CM फडणवीस तातडीने दिल्ली दौऱ्यावर; NCP च्या विलिनीकरणावर मोठा निर्णय होणार?)
"विसरून नका जाऊ या दादाला"
असो नियतीला कोण टाळणार? पण आज पुन्हा एकदा तुमच्याशी बोललो आणि मनाला खुप उभारी मिळाली. आपण असंच अधूनमधून बोलत जाऊयात. विसरून नका जाऊ या दादाला. मी समोर नाहीये तरी तुमचं प्रेम आणि माझ्या विचारांची गती तशीच राहुद्या. स्वत:ची आणि महाराष्ट्राची काळजी घ्या. मी सुद्धा माझी काळजी घेतो इकडे. जय महाराष्ट्र!!!
सोशल मीडियावर प्रतिसाद
हा व्हिडिओ शेअर होताच काही तासांतच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 11 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख 37 हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.