जाहिरात

Ajit Pawar News: "...तर माणूस आहेस की बाई, कळणार नाही", निष्ठावंत कार्यकर्त्याला अजितदादांनी दिला होता सल्ला

Ajit Pawar News: नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विलास झोडपे यांची भेट दादांशी झाली होती. त्यावेळी विलास यांचे वाढलेले केस पाहून दादांनी आपल्या खास शैलीत त्यांना समज दिली होती.

Ajit Pawar News: "...तर माणूस आहेस की बाई, कळणार नाही", निष्ठावंत कार्यकर्त्याला अजितदादांनी दिला होता सल्ला

राजकारणात नेत्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते असतात, पण अजित दादांच्या बाबतीत हे प्रेम काही वेगळेच होते. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील विलास झोडापे या कार्यकर्त्याचा असाच एक विलक्षण संकल्प आज दादांच्या निधनानंतर अपूर्ण राहिला. मात्र, आपल्या नेत्याप्रती असलेली निष्ठा जपत विलास यांनी बारामतीत नीरा नदीच्या संगमावर मुंडन करून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.

काय होता तो संकल्प?

2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विलास झोडापे यांनी एक शपथ घेतली होती. "जोवर अजित दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही, तोवर मी डोक्यावरचे केस कापणार नाही." गेल्या वर्षभरापासून त्यांनी आपले केस कापले नव्हते, ज्यामुळे त्यांचे केस बरेच वाढले होते.

(नक्की वाचा-  Ajit Pawar: अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार? कुटुंबातील 3 आणि कुटुंबाबाहेरील 3 नावे चर्चेत)

अजित दादांनी दिला होता 'हा' मोलाचा सल्ला

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विलास यांची भेट दादांशी झाली होती. त्यावेळी विलास यांचे वाढलेले केस पाहून दादांनी आपल्या खास शैलीत त्यांना समज दिली होती. दादा म्हणाले होते, "विलास, तू केस वाढवल्याने मी मुख्यमंत्री होणार नाही, त्यासाठी संख्याबळ लागतं. त्यापेक्षा लोकांची कामं करा, पक्ष वाढवा. केस वाढवल्याने तू माणूस आहेस की बाई, हेही कळणार नाही आणि तेलाचा खर्च उगाच वाढेल. त्यापेक्षा लोकांची काम करा, पक्ष संघ.टना मोठी करा." आपल्या नेत्याच्या या मिश्किल पण सडेतोड सल्ल्यानंतरही विलास आपल्या संकल्पावर ठाम होते.

भेटीला आले आणि निधनाची बातमी कळाली

योगायोगाने विलास झोडापे हे 28 जानेवारी रोजी सकाळीच अजित दादांना भेटण्यासाठी मुंबईत पोहोचले होते. मात्र, मुंबईत पाऊल ठेवताच त्यांना दादांच्या भीषण अपघाताची बातमी कळाली. धक्का बसलेले विलास तिथून थेट बारामतीकडे रवाना झाले. त्यांनी आपल्या पत्नीला आणि दोन मुलांनाही नागपूरहून बारामतीला बोलावून घेतले आणि सहकुटुंब दादांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले.

(नक्की वाचा- Ajit Pawar News: "12 डिसेंबरलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, पण..." अंकुश काकडेंचा मोठा दावा)

"केस दादांच्या कार्याला अर्पण"

"ज्यांच्यासाठी केस वाढवले, ते दादाच आता या जगात राहिले नाहीत. त्यामुळे आता हे केस कापून त्यांच्या कार्याला श्रद्धांजली म्हणून मी नीरा नदीच्या संगमावर मुंडन करून ते अर्पण करत आहे," अशा भावना विलास झोडापे यांनी यावेळी व्यक्त केल्या. एका कार्यकर्त्याचे आपल्या नेत्यावरील हे निस्सीम प्रेम पाहून उपस्थितही गहिवरून गेले होते.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com