जाहिरात

Akola News: अकोल्याच्या पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेचा मोठा निर्णय! वेळापत्रकात केला 'हा' बदल, वाचा सर्व डिटेल्स

अकोला महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केला आहे.

Akola News: अकोल्याच्या पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेचा मोठा निर्णय! वेळापत्रकात केला 'हा' बदल, वाचा सर्व डिटेल्स
Akola Water Supply Latest News

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Water Supply News : अकोला शहरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आतापर्यंत शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता.पण आता तो तीन दिवसाआड म्हणजेच चौथ्या दिवशी करण्यात येणार आहे. ही नवी व्यवस्था 13 मार्च 2026 पासून लागू करण्यात आली असून पुढील परिस्थितीनुसार त्यामध्ये आवश्यक बदल करण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

मनपाकडून तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याची नवी व्यवस्था 

अकोला महानगरपालिकेने शहरातील वाढतं तापमान आणि पाण्याच्या वाढत्या वापराचा विचार करून पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाने चाळीशी पार केल्यामुळे नागरिकांकडून पाण्याचा वापर अधिक होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा दीर्घकाळ टिकवण्यासाठी पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार शहरातील विविध भागांमध्ये चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना या बदलाची माहिती देत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

नक्की वाचा >> Iran War : एलपीजी गॅसनंतर आता महाराष्ट्रात 'या' उद्योगाला बसणार फटका, जादाचे पैसे देऊन लोकांची खरेदी सुरु

शहराचा पाणीपुरवठा बार्शीटाकळीच्या महान प्रकल्पावर अवलंबून

अकोला शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी काटेपूर्णा अर्थात महान प्रकल्प हा मुख्य जलस्त्रोत मानला जातो.14 मार्च 2026 रोजीच्या आकडेवारीनुसार या प्रकल्पात सध्या 44.07 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच कालावधीत या धरणात केवळ 34.67 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यावर्षी पाणीसाठा तुलनेने जास्त असला तरी उन्हाळ्याची तीव्रता आणि वाढत्या वापरामुळे पुढील काही महिन्यांमध्ये पाण्याची स्थिती कशी राहील याबाबत प्रशासन सतर्क आहे. शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा या प्रकल्पावर अवलंबून असल्याने नियोजनबद्ध वापर आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

नक्की वाचा >> Pune News : लग्न जुळवणाऱ्या शादी डॉट कॉमवर महिलेची फसवणूक, पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

अकोल्यात वाढते तापमान आणि बाष्पीभवनाचा परिणाम

दरम्यान अकोला जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे.परिणामी उपलब्ध पाणीसाठा हळूहळू कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.प्रशासनाच्या माहितीनुसार 31 मार्चनंतर महान धरणातील पाणीसाठ्याची अचूक स्थिती अधिक स्पष्ट होणार आहे.त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com