योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Municipal Corporation News Today : अकोला महानगरपालिकेमध्ये जन्म व मृत्यू दाखल्याबाबत नागरिकांना होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला महापौर शारदा खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. शहरातील नागरिकांकडून जन्म-मृत्यू दाखले वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याने हा मुद्दा गांभीर्याने घेण्यात आला. बैठकीत संबंधित विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत नागरिकांना वेळेत दाखले मिळावेत यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,अशा सूचना देण्यात आल्या. तसेच सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाला एक महिन्याचा कालावधी देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
स्थायी समिती सभापतींचा कारवाईचा इशारा
बैठकीदरम्यान काही नगरसेवकांनी जन्म-मृत्यू विभागातील कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला.नागरिकांना साध्या प्रक्रियेसाठी वारंवार कार्यालयात फेरफटका मारावा लागत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या.या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
नक्की वाचा >> Ratnagiri News: रत्नागिरी हादरलं! पर्यटकांमध्ये घबराट, शहर आणि आसपासच्या परिसरातील लोक घराबाहेर पळाले
त्यानुसार जन्म-मृत्यू विभागातील किमान तीन ते चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.तसेच दोन कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतनवाढीचे इन्क्रिमेंट थांबवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे विभागातील कामकाजात शिस्त येईल आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
निर्णयाची लवकरच अंमलबजावणी
स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की,जन्म-मृत्यू दाखले ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असून नागरिकांना त्यासाठी त्रास होणे योग्य नाही.त्यामुळे विभागातील कामकाज अधिक पारदर्शक आणि जलद करण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहार बंद, महिला बचत गटही चिंतेत, घडलंय तरी काय?
एक महिन्याच्या कालावधीत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आणखी कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असून संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या निर्णयामुळे मनपाच्या कामकाजात सुधारणा होऊन नागरिकांना दिलासा मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world