जाहिरात

Akshaya Tritiya 2026: हापूस सामान्यांच्या आवाक्याबाहेर; अक्षय्य तृतीयेला आंब्यांचा नैवेद्य नाहीच? काय आहेत दर

Akshaya Tritiya 2026 Mango Price: अक्षय्य तृतीयेपूर्वीच हापूस आंब्याचे दर गगनाला भिडले आहेत. उत्पादनात घट आणि आवक निम्मी झाल्याने यंदा सामान्यांच्या ताटातून आंबा गायब होण्याची चिन्हे आहेत.

Akshaya Tritiya 2026: हापूस सामान्यांच्या आवाक्याबाहेर; अक्षय्य तृतीयेला आंब्यांचा नैवेद्य नाहीच? काय आहेत दर
"Akshaya Tritiya 2026 Mango Price: हापूस आंब्याचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे"

- यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Akshaya Tritiya 2026 Mango Price: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला (19 एप्रिल 2026) परंपरेनुसार पूर्वजांना आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो. पण यंदा या परंपरेला वाढत्या महागाईचे ग्रहण लागले आहे. हवामान बदलामुळे कोकणातील हापूसच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने घाऊक बाजारात आंब्याचे दर डझनाला 800 रुपये ते 1,500 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. परिणामी हापूस आंबा खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

हापूस आंब्यांची आवक निम्म्याहून कमी

गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्केट यार्डातील आंब्याची आवक कमालीची घटली आहे. गेल्या वर्षी याच काळात मार्केट यार्डमध्ये दररोज 20 हजार ते 25 हजार पेट्यांची आवक होत होती, ती यंदा केवळ 8 हजार ते 10 हजार पेट्यांवर मर्यादित राहिली आहे. आखाती देशांमध्ये होणारी निर्यात घटल्याने काही प्रमाणात माल स्थानिक बाजारात वळवण्यात आला असला, तरी एकूण टंचाईमुळे दरात मोठी वाढ झाली आहे.

(नक्की वाचा: Sindhudurg News: 'सिंधुदुर्गचं नुकसानच आहे...'शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या नकाशावरून माजी आमदाराचा खळबळजनक दावा)

गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट भाव

मागील वर्षी अक्षय्य तृतीयेला आंबा प्रति डझन 500 रुपये ते 800 रुपयांना मिळत होता. यंदा मात्र हेच दर 1,500 रुपयांपर्यंत गेल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. कोकणात बसलेल्या हवामान बदलाच्या फटक्यामुळे बागायतदार आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत. एकूणच परिस्थिती पाहता यंदा अनेकांची अक्षय्य तृतीया हापूसच्या चवीविना जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(नक्की वाचा: Sion Railway Bridge:सायनकरांसाठी खूशखबर! सायन रेल्वे ब्रीज या तारखेला होणार सुरू? अश्विनी भिडेंनी दिली डेडलाइन)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

Listen to the latest songs, only on JioSaavn.com