
Alibaug News: गोव्यात बाईक किंवा स्कूटीवर फिरण्याचा मज्जा हा अनुभवच खास असतो. आता हाच अनुभव अलिबागमध्येही घेता येणार आहे. अलिबागमध्ये बाईकवर फिरण्याचा अनुभव घेणे अधिक सोपे आणि सुरक्षित झाले आहे. गोवा आणि केरळच्या धर्तीवर, रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे बाईक भाड्याने देण्याच्या सर्व्हिसला अधिकृत परवाना देण्यात आला आहे. यामुळे, पर्यटक आता बाईक आणि स्कूटर भाड्याने घेऊन अलिबाग फिरू शकतील.
परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन प्राधिकरणाने ऑगस्ट महिन्यात 'रेंट-ए-मोटरसायकल स्कीम 1997' अंतर्गत दोन ऑपरेटर कंपन्यांना या सेवा सुरू करण्यासाठी परवाने दिले आहेत. हे परवाने पाच वर्षांसाठी वैध असून, त्याचे वार्षिक शुल्क 1000 रुपये आहे.
(नक्की वाचा- Who Is Sukha Patil: 85 व्या वर्षी फेमस झाले, सोशल मीडियावरील झळकू लागले; कोण आहेत सुखा पाटील?)
या योजनेमुळे नोंदणीकृत ऑपरेटर आता पर्यटकांना आणि स्थानिक अल्प-मुदतीच्या पर्यटकांना तासाभरासाठी किंवा दिवसासाठी बाईक भाड्याने देऊ शकतील. हे ऑपरेटर सरकारचे नियम आणि सुरक्षा मानके पूर्ण करतात, हे सुनिश्चित केले जाईल.
पर्यटन आणि रोजगाराला मिळणार चालना
या निर्णयामुळे अलिबाग पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, स्थानिकांसाठी उत्पन्नाचा एक नवीन स्रोतही निर्माण होईल. यापूर्वी, काही स्थानिक हॉटेल आणि व्यक्ती बेकायदेशीरपणे बाईक भाड्याने देत होते, पण आता पर्यटक परवानाधारक ऑपरेटरकडून अधिकृतपणे बाईक भाड्याने घेऊ शकतील.
(नक्की वाचा- Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे हायवेवर कशी होतेय फसवणूक? हा Insta Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)
परवानाधारकांकडे वैध परवानग्या, विमा आणि फिटनेस प्रमाणपत्र असलेल्या किमान 5 बाईक्सचा ताफा असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांच्याकडे बाईक्सच्या देखभालीसाठी आणि पार्किंगसाठी पुरेशी जागा असावी, अशी अटही घालण्यात आली आहे. या नवीन सेवेमुळे अलिबागमध्ये फिरणे अधिक सोपे आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world