वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत असला, तरी उपचाराच्या प्रक्रियेत आणि रुग्णांना औषधे लिहून देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI Chatbots) बिनधास्त वापर करणे आता चिंतेचा विषय ठरत आहे. जागतिक स्तरावरील नामांकित पब्लिशर 'एल्सेव्हिअर' (Elsevier) च्या नवीन 'क्लिनिशियन ऑफ द फ्युचर 2026' या अहवालानुसार, भारतातील तब्बल 54 टक्के डॉक्टर आणि 71 टक्के परिचारिका क्लिनिकल कामे, नोट्स तयार करणे आणि औषधे सुचवण्यासाठी ChatGPT सारख्या सामान्य AI टूल्सचा वापर करत आहेत.
विशेष म्हणजे, हे एआय टूल्स वैद्यकीय उपचारांसाठी किंवा वैद्यकीय ज्ञानाच्या आधारे तयार केलेले नाहीत. तरीही त्यांचा धडक्यात वापर होत असल्याने हेल्थकेअर तज्ज्ञांनी या ट्रेंडवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
'एल्सेव्हिअर' सर्वेक्षणातील प्रमुख आणि धक्कादायक आकडेवारी
118 देशांतील 2757 वैद्यकीय व्यावसायिकांच्या सर्वेक्षणावर आधारित या अहवालातून खालील गोष्टी उघड झाल्या आहेत. सर्वेक्षणातील 48% डॉक्टरांनी आपल्या दैनंदिन कामात AI वापरत असल्याचे मान्य केले. यातील 54% डॉक्टर्स सामान्य AI टूल्स वापरतात, तर केवळ 26% डॉक्टर्स वैद्यकीय क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे बनवलेल्या AI प्लॅटफॉर्मचा वापर करतात.
(नक्की वाचा- Ketan Agrawal Case: केतनचा जीव वाचला असता; सिया आणि चेतनने पोलिसांना सांगितला 'प्लॅन A')
परिचारिकांचा AI वर विश्वास
71% परिचारिकांनी सामान्य AI टूल्सवर विश्वास दर्शवला असून, 46% परिचारिका विशेष वैद्यकीय वैशिष्ट्ये असलेल्या AI सिस्टीम वापरत आहेत. सुमारे 80% वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, येत्या 10 वर्षांत आरोग्य सेवांमध्ये एआयचा वापर अत्यंत व्यापक आणि अपरिहार्य होणार आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
'एल्सेव्हिअर'चे लीड क्लिनिकल एक्झिक्युटिव्ह डॉ. राहुल गोयल यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना या ट्रेंडबाबत गंभीर भीती व्यक्त केली आहे. "अनेक डॉक्टर क्लिनिकल निर्णयांसाठी जेनेरिक लार्ज लँग्वेज मॉडेल्स वापरत आहेत. हे टूल्स वैद्यकीय निर्णय घेण्यासाठी कधीही डिझाइन केलेले नाहीत. एआय अत्यंत आत्मविश्वासाने उत्तरे देते, परंतु आत्मविश्वासाने दिलेले प्रत्येक उत्तर अचूकच असेल असे नाही."
(नक्की वाचा- Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी पुणे एसटी विभागाची मोठी घोषणा! 350 हून अधिक विशेष बसगाड्या सोडणार)
सामान्य AI आणि मेडिकल AI मधील फरक
सामान्य चॅटबॉट्स इंटरनेटवरील कोणत्याही डेटाचा, अनधिकृत रिव्ह्यूजचा वापर करतात. त्यामुळे ते अनेकदा काल्पनिक किंवा चुकीची माहिती देऊ शकतात. याउलट, मेडिकल AI (उदा. ClinicalKey AI) हे केवळ वैद्यकीय जर्नल्स, संशोधन आणि गाईडलाईन्सवर आधारित असतात.
डॉ. गोयल यांनी स्पष्ट केले की, जर एआयच्या चुकीच्या सल्ल्यामुळे किंवा औषधामुळे रुग्णाला काही इजा झाली, तर त्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी संबंधित डॉक्टरांचीच असेल. एआयवर कोणतीही जबाबदारी टाकता येत नाही. डॉक्टर आणि रुग्णामधील प्रत्यक्ष संवाद हा उपचाराचा आत्मा असतो. एआयमुळे हा मानवी टच आणि अचूकता हरवण्याचा धोका आहे.