काँग्रेस, राष्ट्रवादीने (राशप) मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी जे नाव जाहीर करेल त्या चेहऱ्याला पाठिंबा द्यायला आपण तयार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मला महाराष्ट्राचं हीत हवंय, म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर करावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
काँग्रेस, राष्ट्रवादीने आता नाव जाहीर करावं, तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो त्या नावाला माझा जाहीर पाठिंबा असेल. महाराष्ट्र मला प्यारा आहे. महाराष्ट्राचं हित मला साधायचं आहे. माझ्या डोक्यात वेडीवाकडी स्वप्न नाहीत. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं मी म्हणणार नाही. तेव्हाच यायचं नव्हतं तर पुन्हा कशाला येईन. मात्र महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे जे करता येईल ते करण्यावाचून मी राहणार नाही, असा माझा निर्धार आहे. मात्र कुणी काळ्या मांजरासारखं आडवं येत असेल तर त्यांच्या पेकाटात लाथ घालणार नाही, असं कुणी समजू नये, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा - Haryana Elections Results 2024 हरियाणातील काँग्रेसच्या धक्कादायक पराभवाची 5 प्रमुख कारणं कोणती?)
उद्धव ठाकरेंच्या टायमिंगची चर्चा?
जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपातही काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली.
मात्र आजच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस काहीशी बॅकफूटवर आल्याचं बोललं जात आहे. हरियाणामध्ये काँग्रेस बहुमताचा आकडा गाठेल असं चित्र निकालाआधी होतं. मात्र काँग्रेसच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं गणित वेगळं आहे हे या निकालाने अधोरिखित केलं. हीच संधी साधून उद्धव ठाकरेंनी दबावाचं राजकारण सुरु केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
(नक्की वाचा- हरियाणात भाजपाच्या विजयातील सर्वात मोठा फॅक्टर कोणता? एका गोष्टीमुळे बदललं चित्र)
उद्धव ठाकरेंनी आता काँग्रेसचा कोंडीत पकण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने महाविकास आघाडीत सर्वाधिक जागांवर दावा केला होता. मात्र काँग्रेस मित्रपक्षांशिवाय चांगली कामगिरी करु शकत नाही, असं हरिणातील निकालातून दिसून येत आहे. मध्य प्रेदशातही अशीच परिस्थिती होती. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील काँग्रेसला याबाबत मंथन करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जागावाटपातही याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.