Ashok Kharat News: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांसोबतच आता त्याच्या खासगी आयुष्यातील आणि प्रकृतीशी संबंधित धक्कादायक खुलासे होत आहेत. स्वतःला दैवी शक्ती असलेला सिद्ध करू पाहणाऱ्या खरातला दीड वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा (Paralysis) सौम्य झटका आला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा आजार कोणत्याही नैसर्गिक कारणाने नसून शक्तीवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे झाला होता.
शक्तिवर्धक औषधांचा डोस बेतला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खरात आपली लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी शक्तिवर्धक आणि उत्तेजक औषधांचे मोठ्या प्रमाणात सेवन करत होता. या औषधांच्या अतिसेवनामुळे त्याच्या शरीरावर विपरित परिणाम झाला आणि त्याला अर्धांगवायूचा झटका बसला. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा औषधांचे अनियंत्रित सेवन हृदयावर आणि मेंदूवर ताण आणू शकते, जे जीवावर बेतू शकते.
(नक्की वाचा- Ashok Kharat: अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; मविआ सरकारही भोंदूबाबावर मेहेरबान असल्याचे समोर)
भक्तानेच वाचवले प्राण
झटका आल्यानंतर खरातला नाशिक शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. योगायोगाने, त्या रुग्णालयातील एक डॉक्टर खरातचा भक्त होता. त्याने वेळीच उपचार सुरू केल्याने खरातचा आजार नियंत्रणात आला आणि त्याचे प्राण वाचले. मात्र, या आजाराच्या खुणा आजही त्याच्या शरीरावर स्पष्ट दिसत आहेत.
शरीरावर आजही आजाराचे परिणाम
दीड वर्ष उलटल्यानंतरही खरात पूर्णपणे बरा झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या उजव्या हाताची हालचाल आजही मर्यादित आहे. त्याच्या भुवया खाली-वर दिसून येतात, जे अर्धांगवायूच्या झटक्याचे लक्षण मानले जाते.
(नक्की वाचा- Kolhapur News: कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलसाठी नवे नियम! इंधन खरेदीवर 31 मार्चपर्यंत मर्यादा)
एसआयटी (SIT) आता खरातवर उपचार केलेल्या त्या खासगी रुग्णालयाची माहिती घेत आहे. कोणत्या डॉक्टरने त्याच्यावर उपचार केले आणि त्याला कोणत्या प्रकारची औषधे दिली जात होती, याचा तपास पोलीस करत आहेत.