Bacchu Kadu: विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे पुन्हा एकदा आपल्या मूळ पक्षात म्हणजेच शिवसेनेत परतणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्चू कडू हे थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील आणि आजच विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्जही दाखल करतील.
'प्रहार' आता केवळ सामाजिक संघटना
बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतूनच केली होती. त्यानंतर त्यांनी 'प्रहार'च्या माध्यमातून शेतकरी आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. सूत्रांच्या माहितीनुसार, इथून पुढे 'प्रहार जनशक्ती संघटना' ही केवळ एक सामाजिक संघटना म्हणून काम करेल. राजकीय स्तरावर बच्चू कडू आणि त्यांचे समर्थक आता पूर्णपणे शिवसेनेचे (शिंदे गट) काम पाहतील.
(नक्की वाचा- Thane News: ठाणेकरांची चिंता वाढली! 3 दिवसांत 6 मुले गायब, नेमकं काय घडतंय?)
विदर्भाची जबाबदारी मिळणार?
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडू यांच्यावर मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे समजते आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील एकूण 11 जिल्ह्यांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्याची मुख्य जबाबदारी कडू यांच्या खांद्यावर असेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात बुधवारी रात्री प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीतच पक्ष प्रवेश आणि आगामी रणनीतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.
(नक्की वाचा- NDTV Marathi Impact: लेकीला रिक्षात घेऊन फिरणाऱ्या महिलेला शिवसेनेची साथ; 1 लाखांची भेट तर शिक्षणाचा भार उचलला)
मूळ पक्षात परतण्याचा प्रवास
बच्चू कडू यांच्या या निर्णयामुळे विदर्भातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या पहिल्या काही नेत्यांमध्ये बच्चू कडू यांचा समावेश होता. मात्र, मधल्या काळात त्यांनी काही मुद्द्यांवरून सरकारवर टीकाही केली होती. आता पुन्हा एकदा अधिकृतपणे शिवसेनेत सामील होऊन ते आपली राजकीय ताकद एकवटताना दिसत आहेत. बच्चू कडू यांच्या रूपाने शिवसेनेला विदर्भात एक आक्रमक आणि जनसामान्यांचा नेता मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world