अमजद खान, प्रतिनिधी
भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी सोमवारी कल्याण स्टेशनची पाहणी केली. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर म्हात्रे पहिल्यांदाच कल्याण स्टेशनवर आले होते. म्हात्रे यांनी यावेळी रेल्वे आणि केडीएमसी अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. या प्रसंगी रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रेल्वे प्रवासी संघटनेनं यावेळी प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा खासदारांसमोर वाचला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले म्हात्रे?
म्हात्रे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, 'रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी केली. या ठिकाणी खूप समस्यांना सामोरे जावे लागते. गेली अनेक वर्षे प्रवासी संघटना अधिकारी वर्गाशी पत्र व्यवहार करतात. परंतू कुठल्याही बाबतीत इथले अधिकारी वर्ग निर्णय घेत नाही. प्रवासी वर्गाला सहकार्य करीत नाहीत. प्रशासनगृह, वेटिंग रुप, अग्नीशमन राेधक आदी छोट्या विषयात प्रवाशांच्या तक्रारी दूर केल्या जात नाही. स्टेशनला लागून महापालिकेने प्रसाधनगृह तयार केले. त्यावर महापालिकेने लाखो रुपये खर्च केले. ते प्रशाधनगृह रेल्वे प्रशासनाने तोडले. हा सगळा नागरीकांच्या खिशातून खर्च केला होता.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या तक्रारी सोडवून सोयी सुविधा पुरविण्याकडे जबाबदारीने पाहिले पाहिजे. लांब पल्ल्याच्या गाड्या चार आणि पाच फलाटावर येतात. मात्र वेटिंग रुम एक नंबर फलाटावर आहे. या गोष्टी अधिकारी वर्गास का कळत नाहीत?,' असा सवाल त्यांनी विचारला.
फेरीवाल्यांच्या विरोधात खूप तक्रारी आहे. स्टेशन परिसरातून महिला जातात. त्यांना आवाज देऊन अश्लील कृत्य करतात. नको ते शब्द बोलतात. या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. तीन वेळा या बाबत समजावून सांगितले जाईल. चौथ्या वेळेस आम्ही धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही असा इशारा खासदार म्हात्रे यांनी रेल्वे आणि केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.
( नक्की वाचा : लोकल विस्कळीत झाल्याचा जीवघेणा फटका ! कल्याणच्या वास्तूविशारदाचा दुर्दैवी मृत्यू )
कपिल पाटील यांना आव्हान
म्हात्रे यांनी लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री कपिल पाटील यांचा पराभव केला होता. निवडणुकीच्या निकालानंतरही आजी-माजी खासदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरुच आहे. कपिल पाटील विधानसभा निवडणूक लढवणार, अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. त्यावर हिंमत असेल तर विधानसभा निवडणूक लढवून दाखवा. जनता तुम्हाला चारही मुंड्या चित करेल, असं आव्हान म्हात्रे यांनी भिवंडीच्या माजी खासदारांना दिलं.